आरोग्यमंत्री टोपे यांनी अधिकाऱ्यांना दिले 'कडू काढ्याचे' डोज!

आरोग्यमंत्री टोपे यांनी अधिकाऱ्यांना दिले 'कडू काढ्याचे' डोज!

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : कोविड-19 चा हॉटस्पॉट असलेल्या अकोला शहराला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी भेट दिली. अडीच महिन्यात सहाशेच्यावर वाढलेल्या कोरोनाग्रस्तांच्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी गलथान कारभार असलेल्या अकोला आरोग्य खात्याची तपासणी करून, अकोलेकरांच्या डोक्याला ताप ठरलेल्या संबंधित यंत्रणेतील अधिकारी यांना तपासून   'कडू काढ्याने' औषधोपचार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

गुरुवारी सकाळी ना.टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आजपर्यंत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविलेल्या  उपाय योजनांचा आढावा घेतला. शहरातील बाधित आकडा रोखण्यात आरोग्य यंत्रणेला आलेले अपयश हे समन्वयाचा अभाव असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय अधिव्याख्याता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांचा अतिरिक्त वर्ग घेऊन 'कडू काढ्याचे' डोस देवून उपचार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोना बाधितांची तपासणी वेळेवर न होणे, रुग्णांची गैरसोय आणि कोविड केयर सेंटरची दुरावस्था याबाबतही त्यांनी आरोग्य यंत्रणेची चांगलीच कान उघाडणी केली. महिनाभरात संक्रमण कसे कमी करता येईल, यावर चर्चा करून उपाय सुचविले. बैठकीला जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक,लोक प्रतिनिधी आणि विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

.........

टिप्पण्या