५ जून - पर्यावरण दिन विशेष:दिशा प्रयत्नांच्या.....!

( ५ जून - पर्यावरण दिन विशेष)


दिशा प्रयत्नांच्या.....!
         हा नाश थांबवा भूमातेचे
        तनमन जळते आहे..
        ही वसुंधरा प्रदूषणाच्या
        कारणाने रडते आहे...


निसर्ग आणि मानव यांचे अतूट नाते! आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या बळावर संस्कृतीची उभारणी करणारा आणि प्रचंड प्रगती साधणारा एकमेव प्राणी म्हणजे मानव.... मानवाच्या या समाजवैशिष्ट्यांमुळे व समाजप्रियतेमुळे त्याच्या भोवतीच्या नैसर्गिक पर्यावरणाला सामाजिक पर्यावरणाचीसुद्धा जोड मिळाली. आधुनिक काळात एकीकडे मानवाने प्रगतीची उत्तुंग शिखरे गाठली. परंतु दुसरीकडे नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणाविषयी गुंतागुंतीच्या व भयावह समस्या उभ्या राहिल्या. त्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विषयक जाणिवा जागृत होऊ लागल्या. पर्यावरण रक्षण केले पाहिजे. मानवी अस्तित्व टिकविले पाहिजे आणि ते आपण समृद्धही केले पाहिजे या दृष्टिकोनातून ५ जून १९७२ रोजी बदलत्या हवामानाविषयी स्टॉकहोम येथे पहिले विचारमंथन करण्यात आले. त्या दिवसापासून दरवर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे. समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण.....
मानव हा पर्यावरणाचा एक कुशाग्र घटक....  मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. सुरुवातीपासूनच मानवाने आपल्या गरजा भागविण्यासाठी सर्वस्वी निसर्गावरच ताण दिलेला आहे. त्यातच आपल्या गरजा भागवत असतांना त्याचा पर्यावरण व इतर सजीवसृष्टीवर काय परिणाम होईल याकडे कधी जाणीवपूर्वक पाहिलेच नाही. स्वतःला अन्न भाजून, शिजवून खाण्यासाठी अग्नीचा शोध लावला. अन् खऱ्या अर्थाने तेथपासूनच पर्यावरणामध्ये प्रदूषणास सुरुवात केली होती मानवाने..... मात्र त्यावेळी त्याचे प्रमाण अत्यल्प होते. जसजसा मानवाच्या मेंदूचा विकास होत गेला तसा त्याने औद्योगिकीकरणाचा शोध लावला. उद्योगधंदे सुरू झाले. कारखानदारी वाढली. तसेच प्रदूषण वाढण्यास चांगलाच हातभार लागत गेला आणि आज भरमसाठ कारखानदारी वाढलेली आपणास पहावयास मिळत आहे. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गातील समतोल बिघडलेला आहे. अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. हवामान बदलत आहे. तापमान वाढत आहे. अशा विविध गोष्टींमुळे ग्लोबल वॉर्मिंगचा महाराक्षस समोर उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील अकोला सारखे शहर तापमानाच्या बाबतीत मागील वर्षी जगात प्रथम क्रमांकावर व यावर्षी पण चौथ्या क्रमांकावर येते हे निश्चितच भूषणावह नाही आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैली कारणीभूत आहे. चंगळवाद भागविण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर पृथ्वीवर जगणेच मुश्कील होईल असा इशारा पर्यावरण तज्ञांनी दिला आहे. त्यासाठी मानवाला एवढचं सांगावसं वाटतं.... हे मानवा,
          पर्यावरण समतोल राखण्या
          नियोजन कर तू  खास...
          कारण प्रदूषणाच्या विळख्याने
          गुदमरलाय वसुंधरेचा श्वास...


मग काय करता येईल आपल्याला ? आपण बोलतो की, चांगला विकास झाला आहे. मात्र या कारखान्यांमधून बाहेर पडणारा काळाकुट्ट धूर, ज्यामध्ये असणारा कार्बन-डाय-ऑक्‍साईड संपूर्ण सजीव जातीच्या आरोग्यासाठी अतिहानिकारक आहे, याचा आपण कधी जाणीवपूर्वक विचार करण्यासच तयार नसू तर आपले जीवन धोक्यात आहे, हे आपण जाणले पाहिजे. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनाची रासायनिक तपासणे व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. नदीमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे दूषित झालेल्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केल्यास पाण्याची दुर्गंधी टळून पाणी दूषित होणार नाही, सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच त्यातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास याचे महत्त्व पटवून देणे इत्यादि विविध उपक्रम राबवून पर्यावरणाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते. इलेक्ट्रिक उपकरणांशिवाय हातांनी कामे करण्याचा संकल्प करुया. गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. पाण्याचा अतिवापर टाळूया. घरातून बाहेर पडतांना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करता येऊ शकतो. ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांचेही प्रमाण संतुलित नाही. याला कारण झाडांची झालेली कत्तल आणि गळती....! आणि यालासुध्दा जबाबदार मानवच...... ऊन-पावसात आधार देणारी झाडे आज आपल्याला शोधावी लागतात. यावर उपाय म्हणून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रम प्रत्येकाने राबविणे ही काळाची गरज आहे. कारण अधिकाधिक ऑक्सिजनची निर्मिती केवळ आणि केवळ वृक्षांमार्फतच होते. म्हणूनच..
          झाडांमुळे आपला श्वास
          झाडे देतात जगण्याचा विश्वास...
          त्यांच्यामुळे आपण सुदृढ खास
          झाडे लावू, झाडे जगवू आसपास...

पर्यावरणाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यानेच दुष्काळ, महापूर, रोगराई, त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढगफुटी, पाण्याची पातळी खालावणे अशा नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीत जगावर कोरोना विषाणूचं वारं सुसाट वेगानं घोंघावत आहे. त्याचा सामना करण्यासाठी मानवाला शर्थीचे प्रयत्न करत स्वतःला घरात कोंडून घ्यावे लागत आहे. किती ही शोकांतिका....! तसेच आधीच ' कोरोना' चे संकट असतांना भरीसभर या पर्यावरणाच्या असंतुलनामुळेच नुकताच आपल्याला 'निसर्ग चक्रीवादळाचा' सामना करवा लागला. प्रत्यक्षात किती भयावह परिस्थिती मानव ओढवून घेत आहे. विकासाच्या प्रवाहात मानव भावनाशून्य होऊन किती ओढल्या जात आहे याची प्रचिती देणारी नुकतीच घडलेली घटना म्हणजे गर्भवती हत्तीनीची अननसात फटाके भरून केलेली  हत्या...! किती कौर्याचा कळस...! हे सर्व पाहतांना मन अगदी विषण्ण होते. म्हणूनच विकास आणि पर्यावरण या दोन्हींचे भान ठेवून विवेकशील वाटचालीची गरज हा संस्कार सर्वांच्या मनावर असणे महत्वाचे आहे. बदलती मानसिकता प्रत्येकात निर्माण होणे गरजेचे आहे आणि त्याहूनही अधिक महत्त्वाचे ठरतात ते त्यासाठी केलेले प्रत्यक्षातले प्रयास....! जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने सर्वांनी मिळून निश्चय करू की, पर्यावरणाची हानी होणार नाही, असा एक तरी संकल्प मी करेन.... आणि तो कसोशीने पाळण्याचा आग्रह असेल... मग त्यात माझा खारीचा वाटा हा नक्कीच असणारच....!!
चला तर मग, घेऊयात वसा आपल्या वसुंधरेच्या सुंदरतेचा...!!

          वृक्षारोपणाचा संकल्प करून
          झाडे करूया हिरवीगार
          दुष्काळावर करून मात
          वसुंधरा दिसेल बहारदार...



- मनिषा मधुसुदन शेजोळे
अकोला
मो. ९४०३२६१८४७


टिप्पण्या