विभागीय क्रीडा संकुलात सौर ऊर्जा संयंत्र बसवावे

विभागीय क्रीडा संकुलात सौर ऊर्जा संयंत्र बसवावे

विभागीय क्रीडा संकुलात सौर ऊर्जा संयंत्र बसवावे

नागपूर : सौर ऊर्जा ही पारंपरिक ऊर्जेपेक्षा स्वस्त व शाश्वत असल्याने विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणाने (मेडा) सौर ऊर्जा संयंत्र बसवण्याचे आदेश क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, अधीक्षक अंभियता व्ही.डी. सरदेशमुख, मेडाचे विभागीय संचालक सारंग महाजन, नागपूर महानगर प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये आदी उपस्थित होते.

विभागातील क्रीडा विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात तालुका क्रीडा संकुलासाठी जागा अद्याप अप्राप्त आहे. ही जागा मिळण्यासाठी पाठपुरावा करावा. खेलो इंडिया योजनेतील केंद्राकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला.
मानकापूर येथील क्रीडा संकुलातील कोणतेही काम हे दर्जेदार व गुणवत्तेचे असावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विभागीय क्रीडा संकुलातील जागेचे भाडेपट्टा नुतनीकरण करण्याच्या सूचना  त्यांनी विभागीय आयुक्तांना  केल्या. तसेच संकुलाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे असेही त्यांनी सांगितले. सुरक्षेसाठी गृहरक्षक जवान नियुक्त करण्यात यावे.
क्रीडा संकुलासमोरील अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

टिप्पण्या