पालकमंत्री बच्चू कडू: काळ्या मातीत ...मातीत ...तिफन चालते...खुद्द बच्चू कडू यांनी शेतात चालविला तिफन...

काळ्या मातीत... मातीत... तिफन चालते...खुद्द बच्चू कडू यांनी शेतात चालविला तिफन...



*राजनापूर खिनखीनी येथे विकास कामांचा आढावा


*बोरगाव मंजू व वाशिंबा येथील उद्योगांना भेट


भारतीय अलंकार

अकोला,दि.१६: सव्वा बाराच्या सुमारास… दुपारच्या वेळी राजनापूर खिनखीनी या गावाच्या शिवारातून पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या गाड्यांचा ताफा चाललाय. अचानक रस्त्यात उभ्या एका शेतकऱ्यांने मंत्री महोदयांना आवाज दिला. प्रशांत भानुदास साबळे असे त्या शेतकऱ्याचे नाव. रस्त्याच्या कडेला असलेल्या त्याच्या शेतात पेरणीची  लगबग सुरु आहे.  तिफन लावून बैलजोडी तैनात आहे. मुळचे शेतकरी असलेल्या पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना तिफन चालवण्याची  तीव्र इच्छा होते. त्यासाठी ते  गाडीतून उतरुन शेताकडे धाव घेतात. सोबतचे अधिकारी, पोलीस साऱ्यांनाच कळत नाही नेमके काय चालले ते... तोवर पालकमंत्र्यांनी  बैलाच्या कासऱ्या हातात सुद्धा घेतलेल्या असतात. आणि त्यांनी तिफन चालवायला सुरुवात ही केलेली असते. पालकमंत्र्यांची ही अकस्मिक कृती मात्र उपस्थित साऱ्यांना सुखावून जाते. त्या शेतकऱ्याला अशा श्रमदानातून पेरणीच्या शुभेच्छा देऊन ना. कडू यांनी आपलं काळ्या आईशी, शेती आणि शेतकऱ्याशी असलेलं नातं अधिक दृढ केलं


राजनापूर खिनखीनी येथे विकास कामांचा आढावा

गावाच्या विकासासाठी प्राप्त होणारा निधी खर्च करतांना रोजगार निर्मितीवर भर द्या. त्यातही भूमिहीन, कोरडवाहू, अल्प भूधारक शेतकरी, दिव्यांग, विधवा,परितक्त्या महिला अशा सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज राजनापूर खिनखीनी येथे दिले.

यावेळी गावाचे स्मार्ट व्हिलेज अंतर्गत प्राप्त १० लाख रुपयांच्या प्राप्त निधीचा धनादेश ना.कडू यांच्या हस्ते सरपंच प्रगती रुपेश कडू यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

राजनापुर खिनखीनी येथे आज ना.कडू यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सरपंच प्रगती रुपेश कडू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, सहायक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर,शाखा अभियंता जी.एम. मसने, उपविभागीय कृषी अधिकारी अ.दे. कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी ए. ए. काळे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गावातील टंचाई नळ दुरुस्ती मधून चार लक्ष १७ हजार ८१० रुपये, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १८ लक्ष रुपये,व्यायाम शाळेसाठी सात लक्ष रुपये, गावातील अंतर्गत रस्ते गटारी यासाठी १५ लक्ष रुपये, स्मार्ट व्हिलेज प्रकल्पासाठी १० लक्ष रुपये, आर ओ प्लांट साठी पाण्याची टाकी १७ लक्ष रुपये, स्मशानभूमीचे कुंपण व सौंदर्यीकरण करण्यासाठी १० लाख रुपयांच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच गावातील रेशनकार्ड ,संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अधिवास प्रमाणपत्र, प्राचीन मंदिरासमोरील विहीर दुरुस्तीकरण व खोलीकरण, घरकुल प्रकरणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, दिव्यांग योजना, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अतिरिक्त वर्ग घेणे, शेळी पालन,कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय शिवणकाम याबाबत २० बचत गटांना प्रशिक्षण, गावकऱ्यांचे पीक विमा योजना प्रकरणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, शिवकालीन तलाव दुरुस्ती व अन्य कामे याबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी गावातील वृक्ष लागवडीचा आढावा घेणे, तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्रव संदर्भात तक्रारीच्या निराकरणासाठी ५०हेक्टर चे वनक्षेत्र कुंपण बंदिस्त करा, वन हक्क समिती गठीत करून गावकऱ्यांना उत्पादन मिळेल यासाठी योजना तयार करण्याचेही निर्देश ना.कडू यांनी दिले. तसेच गावाच्या ग्रामपंचायतीच्या शाश्वत  उत्पन्नासाठी सौर उर्जेवर आधारीत विविध उपक्रम राबविण्यात यावे अशी सुचनाही त्यांनी  केली. त्यानंतर ना.कडू यांनी गावच्या शाळेची, तसेच शिवकालीन तलावाची  पाहणी केली.

बोरगाव मंजू व वाशिंबा येथील उद्योगांना भेट


राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज बोरगाव मंजू व वाशिंबा येथील लघु उद्योगांना भेट दिली.    

विविध प्रकारे गावांच्या संकल्पना राबवून झाल्या. मात्र गावाचा विकास करण्यासाठी उद्योगपूर्ण गाव ही संकल्पना राबविण्या साठी प्रयत्नशील राहू, असे  मत त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

बोरगाव मंजू येथील लघु उद्योग केंद्रात  ३५ उद्योजक मिळून एक टेक्सटाईल क्लस्टर तयार करीत आहेत. त्या क्लस्टरमध्ये धागा तयार करुन ते कापड बनविण्यापर्यंतचे २० युनिटस आहेत.  या प्रकल्पासाठी बॅंक अर्थसहाय्याचे प्रश्न आपण मार्गी लावू असे आश्वासन ना. कडू यांनी उपस्थित उद्योजकांना दिले.

त्यानंतर त्यांनी वाशिंबा येथील विठ्ठलराव वानखडे  ग्रामोद्योग वसाहतीस भेट दिली. या ठिकाणी २० लघु उद्योजकांनी अगरबत्ती निर्मितीचा उद्योग सुरु केला आहे.  याठिकाणी ५० हून महिलांना रोजगार मिळाला आहे. या सर्व उद्योजकांना एक ब्रॅण्ड निर्मिती करुन त्याद्वारे त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री ना. कडू यांनी  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांना दिले. यावेळी  जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तेरानिया व अन्य अधिकारी , उद्योजक उपस्थित होते. येथील कामगारांना विमा संरक्षण द्या, असे निर्देशही ना. कडू यांनी दिले.

....................




टिप्पण्या