World no Tobacco day:तंबाखूयुक्त पदार्थांचे वाढते सेवन धोक्याचे!

तंबाखूयुक्त पदार्थांचे वाढते सेवन धोक्याचे!
आज जागतिक तंबाखू विरोधी दिन

देशामध्ये दरवर्षी तंबाखू सेवनामुळे ६ कोटी लोक मृत्युमुखी पडतात, ही चिंतेची बाब आहे. दरवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार ३१ मे हा जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखूयुक्त पदार्थाचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न बनला आहे. तंबाखूची आवड असणारा वर्ग सर्वच स्तरात दिसून येतो. त्यातही युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने युवकांना तंबाखू सेवनापासून परावृत्त करा हे घोषवाक्य दिले आहे.
तंबाखू हा विविध प्रकारे वापरला जातो. धूम्रपान, नस ओढणे, तपकीर ओढणे, तंबाखूयुक्त मिश्रीचा वापर, तंबाखू चोळून खाणे, गुटखा, बिडी, सिगारेट, हुक्का  इत्यादीमध्ये तंबाखूचा वापर केला जातो. त्याचे दुष्परिणाम शरीरावर होत असतात. त्यामुळे तोंडाचा, अन्ननलिकेचा, श्वासनलिकेचा कर्करोग होतो. यात तोंड उघडता येत नाही, अन्न गिळता येत नाही. या आजाराचे सर्वप्रथम १९५३ मध्ये डॉ. जोशी आणि डॉ. लाल यांनी वर्णन केले. तंबाखूसोबत सुपारीचे सेवनही घातकच असते. अलिकडे प्रौढांसोबतच कुमारवयीन मुलेही मोठ्या प्रमाणावर तंबाखूच्या आहारी गेल्याचे दिसून येते. तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता आणि कमी किंमत ही कारणे त्यासाठी सांगता येतील. तंबाखू न खाता केवळ तंबाखूजन्य पदार्थ सेवन करीत असलेल्या व्यक्तींच्या आजूबाजूला वावरणारे लोक अप्रत्यक्षपणे त्यांच्या शरीरात तंबाखूचे विषारी पदार्थ जाऊन मृत्युमुखी पडतात. धूम्रपान करणारी व्यक्ती त्याच्या बाजूला असलेल्या व्यक्तीलाही त्याचा डोस देत असते. त्याला 'पॅसिव्ह स्मोकिंग' म्हणतात. तंबाखूमध्ये बरेच विषारी पदार्थ असतात. सिगारेट, बिडी यांच्या धुरात जवळजवळ ४ हजार प्रकारच्या विषारी रासायनिक पदार्थांचा समावेश असतो. तंबाखूची सवय लागल्यानंतर सोडावीशी वाटत नाही. त्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागते. दीर्घायुषी व्हायचे असेल, तर रोगमुक्त राहण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणजे तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ आणि सुपारी यापासून दूर राहणे आवश्यक आहे.
भारतात सध्या सुमारे २५ लाख कर्करुग्ण आहेत. त्यात दरवर्षी ७ लाख लोकांची भर पडते. पुरुषांमधील आणि स्त्रियांमधील कर्करोग हे भिन्न स्वरूपाचे आहेत. पुरुषांची जीवनशैलीच मुळात घातक आहे. एकूण कर्करुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा संबंध तंबाखूशी आहे. धूम्रपानामुळे कर्करोग झालेले जगभरात आहेत. भारतात मात्र बिडी ओढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. खैनी आणि त्यासोबत चुना (घोटा) याची गोळी गाल आणि जबड्याच्या मध्ये किंवा जिभेखाली ठेवली जाते. त्यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होऊन चिडचिडपणा, अस्वस्थपणा वाढतो, तंबाखूजन्य पदार्थ न मिळाल्यास बेचैनी वाढते. गरोदर मातावर विशेष परिणाम होऊन कमी दिवसाचे, कमी वजनाचे मूल जन्मते किंवा मृत्युमुखी पडते, तसेच लहान मुलाच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते. सिगारेटच्या धुरामुळे लहान मुलांवर परिणाम होतो. धूम्रपान हे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारण आहे. हृदयविकारासाठी कारणीभूत असलेल्या दहा गोष्टींमध्ये धूम्रपानाचा (चेन स्मोकर) समावेश आहे. धूम्रपानावर नियंत्रण मिळविल्यास हृदयविकाराचे प्रमाण २५ टक्क्यांनी कमी होते, असे जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. अशा घातक पदार्थाचे सेवन न करणे कधीही चांगले. यासाठी तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाची जाणीव जनतेला करून देणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणारे यांच्याविरुद्ध धूम्रपान प्रतिबंधक कायदा २००८ मध्ये करण्यात आला. तो २ ऑक्टोबर २००८ पासून लागू झाला.  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणारे यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. हॉटेल, रेस्टॉरंट आदी ठिकाणी स्मोकिंग झोन असणे आवश्यक आहे. त्यासाठी मालक, व्यवस्थापक यांनी तशा आशयाचा फलक लावणे बंधनकारक आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बसथांबा, रेल्वेस्थानक, चित्रपटगृह अशा ठिकाणी धूम्रपान करणारे तसेच संबंधित मालक, व्यवस्थापक हेदेखील या कायद्याच्या उल्लंघनास जबाबदार ठरतात. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कुणालाही धूम्रपान न करू देण्याचा संकल्प करुया! हा कायदा मोडणारे यांची माहिती आपण १८०० ११० ४५६ या टोल फ्री क्रमांकावर देऊ शकता. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी 'जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त' युवकांना तंबाखूसेवनापासून रोखण्यासाठीचे घोषवाक्य देऊन जगभरातील सर्व देशांना आवाहन केले आहे, की त्यांनी मनापासून प्रयत्न करून धूम्रपानाच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करावे. जर आताच यावर नियंत्रण मिळविले नाही, तर २०३० पर्यंत तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन ८० लाख लोकांचे बळी घेईल! तंबाखू उद्योगांनीही स्वत:हून या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करणे अपेक्षित आहे.  
- प्रकाश गवळी,
जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी,
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, अकोला                                          
 मो. ९८८१७४३४०७

टिप्पण्या