Lockdown:लॉकडाउनमध्ये अभिनेत्री इलाक्षी मोरेने केले मुलांना मार्गदर्शन

लॉकडाउनमध्ये अभिनेत्री इलाक्षी मोरेने केले मुलांना मार्गदर्शन
डॉक्टरांच्या मुलांमधील कलागुणांना मिळाला वाव!

 'आयएमए वुमन्स डॉक्टर्स विंग'चा पुढाकार

'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोर पालन

अकोला: विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या अकोला येथील 'इंडियन मेडिकल असोसिएशन' अर्थात 'आयएमए'च्या 'वुमन्स डॉक्टर्स विंग'ने लॉकडाऊनच्या काळात शहरातील डॉक्टरांच्या मुलांमधील कलागुणांना वाव देणारे उपक्रम राबवित सर्वांच्याच वेळेचा सदुपयोग करून घेतला. या उपक्रमांमुळे या मुलामुलींमध्ये एकप्रकारे चैतन्य निर्माण झाले. यामध्ये तानाजी फेम सोयराबाई' डॉ. ईलाक्षी मोरे गुप्ता यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. 
आयएमए, अकोला या संघटनेच्या वुमन्स डॉक्टर्स विंगच्या नवीन कार्यकारिणीने १ एप्रिलपासून पदभार सांभाळला आहे. या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षा डॉ. मिनाक्षी मोरे, सचिव डॉ. निर्मला रांदड, कोषाध्यक्ष डॉ. झेलम देशमुख, सहसचिव डॉ. अंजली सोनोने, सांस्कृतिक सचिव डॉ. सुवर्णा भोपाळे व डॉ. प्रज्ञा वरठे यांचा समावेश आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील 'आयएमए'ची डॉक्टर मंडळी सर्वोपचार रूग्णालय आणि 'कम्युनिटी क्लिनिक'मध्ये रूग्णसेवेत व्यस्त आहेत. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने या डॉक्टरांची मुले घरात बसून कंटाळू नयेत यासाठी 'वुमन्स डॉक्टर्स विंग'ने त्यांच्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करून ते उपक्रम यशस्वीपणे राबविले, त्यामुळे डॉक्टरांच्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळाला.  
'वुमन्स डॉक्टर्स विंग'ने लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर्स आणि त्यांच्या कुटुंबियांचे मानसिक, शारीरिक मनोबल वाढविण्यासाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले. विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम 'सोशल डिस्टन्सिंग'चे काटेकोरपणे पालन करीत, उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीने पार पाडण्यात आले. या उपक्रमांतर्गत स्वत:ची निगा कशी राखावी यावर सुप्रसिद्ध ब्युटीशियन शरद भुयार यांनी चर्चासत्र घेतले. लहान मुलांसाठी थोर व्यक्तींवर आधारित फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभक्तीवरील '' वो भारत देश है मेरा'' या गाण्यावर डॉक्टरांच्या मुलांनी सुंदरसे नृत्य सादर केले. यासाठी 'तानाजी फेम सोयराबाई' डॉ. ईलाक्षी मोरे गुप्ता यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. व्हिडीओ एडिटिंग डॉ. निर्मला रांदड यांनी केले. यामध्ये डॉ. ईलाक्षी, शिवांगी, जुही, नकुल, मानसी, आयुष, आरव, ऋतिका, रिया, ऋती, मुक्ता, स्वराज, विराज, रजत, राजवर्धन, मयंक, निरव, कस्तुरी, शिवम, डॉ. आकांक्षा, वृषाली, साक्षी, कोमल, खुशबू, एंजल, तनय यांनी सहभाग घेतला. डॉक्टरांच्या मुलांच्या ज्ञानात वृद्धी व्हावी यासाठी सांस्कृतिक, आरोग्यविषयक, विज्ञान विषयक कार्यक्रमही आगळयावेगळया उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. शिबिरात श्लोक, प्रार्थना, आसन, विज्ञानाच्या गोष्टी, टाकावू वस्तूपासून विविध फुले, फलॉवरपाट, बॉक्स बनविणे, रांगोळी, झाडे लावणे व त्यांची निगा, आरोग्य आदि उपक्रम राबविण्यात आले. ध्यानसाधना करून मानसिक शांती व संतुलन कसे राखावे याचीही माहिती यावेळी देण्यात आली. 
मेडिकल कॉलेजमध्ये रात्रंदिवस कार्यरत असलेल्या ‘आयएमए’च्या डॉक्टरांमध्ये रूग्णसेवेची भावना वाढीस लागावी यासाठी त्यांना उच्चदर्जाचे पीपीई किटस आणि एन ९५ मास्कही वितरीत करण्यात आले. या सर्व ऑनलाईन कार्यक्रमांची धुरा डॉ. निर्मला रांदड यांचे ‘आयआयटीयन’ सुपूत्र नकुल रांदड यांनी सांभाळली तसेच ‘गॉडस ओन डायनेस्टी’ या खगोलशास्त्र विषयावर आधारित शोसुद्धा नकुल रांदड यांनी अतिशय सुंदररित्या सादर केला. सर्व कार्यक्रमांचे आयोजन 'डॉक्टर वुमन्स विंग'च्या अध्यक्षा डॉ. मिनाक्षी मोरे ,सचिव डॉ.निर्मला रांदड आणि कार्यकारणी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांना सर्वांचाच उत्तम प्रतिसाद मिळाला.

टिप्पण्या