Hapus Mango:ग्रामवासियांना चाखायला मिळणार 'हापूस'ची चव!

ग्रामवासियांना चाखायला मिळणार 'हापूस'ची चव!
लॉकडाऊन संपताच करणार 'रसोळी'चे वाटप
रूपसिंग व माला बागडे यांचा उपक्रम

अकोला: विविध समाजोपयोगी, प्रबोधनात्मक आणि कलागुणांना वाव मिळवून देणारे अनेक उपक्रम राबविण्याची परंपरा जोपासणारे राष्ट्रीय स्तरावरील वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त मोरगाव भाकरे येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक रूपसिंग बागडे आणि त्यांच्या पत्नी निवेदिका सौ. माला बागडे यांनी ऐन उन्हाळयात सर्वांनाच उत्कंठा असणारा हापूस आंबा चाखण्याची संधी ग्रामवासियांना उपलब्ध करून देण्याचा मानस यावर्षीही व्यक्त केला आहे. सध्या सुरू असणारा लॉकडाऊन संपताच ग्रामवासियांना या 'रसोळी'चा आस्वाद चाखावयास देणार असल्याचे या उभयतांनी सांगितले.
पावसाळयाची चाहूल लागताच वर्षाराणीला साद घालणारा 'अकोला वर्षा महोत्सव' आणि 'गाणी पावसाची', १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आयोजित केले जाणारे 'मॉं तुझे सलाम', 'जरा याद करो कुर्बानी' आणि 'हम हैं हिंदुस्थानी' हे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले बागडे उभयतांचे विविध रसांनी ओतप्रोत असणारे कार्यक्रम! या सर्वच कार्यक्रमांच्या माध्यमातून बागडे कुटुंबाने केवळ माणसे जोडण्याचेच नव्हे तर प्रत्येकाची निसर्ग आणि राष्ट्रप्रेमाशी, राष्ट्र स्वाभिमानाशी नाळ जोडण्याचे अतुलनीय कार्य केले आहे आणि अजूनही करीत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दानशूर व्यक्ती, विविध संस्था आणि संघटना समोर येवून गोरगरीबांना अन्नधान्य व इतर जीवनावश्यक साहित्याची मदत करीत आहेत. हे एकप्रकारे राष्ट्रप्रेमाचे, बंधूभावाचेच द्योतक आहे. असाच वारसा रूपसिंग आणि सौ. माला बागडे यांनीही गेल्या पाच वर्षांपासून जोपासला आहे. समाजातील अडल्या नडलेल्यांना मदतीसाठी नेहमीच तत्पर असणारे बागडे कुटुंब दरवर्षी ग्रामीण भागातील १५ घरांची निवड करून त्यांच्यापर्यंत हापूस आंबा पोहोचविण्याचे कार्य नि:स्वार्थपणे करीत आहेत. हापूस आंबा म्हणजे आंब्यांचा राजा! या रसाळ राजाची किंमत गरीबांच्या आवाक्याबाहेरची असल्याने त्याचा आस्वाद घेण्यापासून गोरगरीब वर्ग नेहमीच वंचित राहात आला आहे. ही बाब हेरून रूपसिंग आणि सौ. माला बागडे यांनी सन २०१५ पासून ग्रामीण भागातील गावांमध्ये जावून तेथील गरीब कुटुंबांना हापूसची चव चाखण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम चालविला आहे. यापूर्वी त्यांनी भौरद केंद्रांतर्गत गावांमध्ये प्रत्यक्ष जावून तेथील गोरगरीब १५ कुटुंबांची निवड करून त्यांना रसोळीचा स्वाद प्राप्त करून दिला आहे. या कार्यासाठी त्यांना भौरद केंद्राच्या प्रमुख राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त डॉ. निलिमा आमले यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत आहे.
विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांप्रमाणेच गरीबांच्या आवाक्या बाहेरील हापूसचा स्वाद देवून त्यांच्या मुखकमलावर हास्याची लकेर उमटविण्याचा बागडे उभयतांचा उपक्रम खरोखरीच वाखाणण्याजोगाच आहे. दोघेही विविध उपक्रम स्वखर्चातून राबवीत असले तरी प्रसिद्धीच्या हव्यासापासून ते कोसो दूर आहेत. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना मदतीचा हात देणारे दानशूर आणि सर्वसामान्य व्यक्ती, कोरोनासोबत दोन हात करणारे डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार आणि पोलिस यांच्या कार्याला सलाम करतानाच बागडे दाम्पत्याने लॉकडाऊन संपताच ग्रामवासियांना हापूसची चव चाखण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
.........

टिप्पण्या