Coronavirusnews:केवळ चार व्यक्तीच्या उपस्थितीत होतील लग्न!

केवळ चार व्यक्तीच्या उपस्थितीत होतील लग्न!

उपस्थित राहणाऱ्याची होईल आरोग्य तपासणी

अकोला,दि.५: कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी  लागू असलेल्या संचारबंदी कालावधीत आयोजित करावयाच्या लग्न समारंभांना परवानगी देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले असून त्या त्या भागातील उपविभागीय अधिकारी यांना परवानगी अधिकारी म्हणून प्राधीकृत करण्यात आले आहे.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की,  येत्या १७ तारखेपर्यंत संचारबंदी लागू आहे. तथापि या कालावधीत आयोजित करावयाच्या लग्न समारंभासाठी  परवानगी देण्याबाबत अटी शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत.

विवाह समारंभांना परवानगी देण्याबाबत अटी शर्ती-

वर व वधू यांना वगळून केवळ चारच व्यक्तींना परवानगी देण्यात येईल. लग्न समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने घरगुती स्वरुपात साजरा करावा.  प्रतिबंधित क्षेत्रात लग्न अथवा कोणत्याही समारंभास परवानगी दिली जाणार नाही. लग्न समारंभास उपस्थित राह्णाऱ्या सर्व संबंधितांची आरोग्य तपासणी करुन कोवीड १९ ची कोणतीही  लक्षणे नसल्याबाबत नोंदणीकृत शासकीय / खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. लग्न समारंभा करीता परवाना अधिकारी यांनी जिल्ह्या अंतर्गत अथवा जिल्ह्या बाहेर  निश्चित स्थळी येण्या-जाण्यासाठी केवळ एकाच वाहनास परवानगी द्यावी. वापरण्यात येणारे वाहन निर्जंतुकीकरण करण्यात यावे. चेहऱ्यावर मास्क लावणे व किमान अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. वापरण्यात येणाऱ्या वाहनाचा नोंदणी क्रमांक व परवाना क्रमांक  परवान्यावर नमूद करावा. लग्न समारंभासाठी अन्य जिल्ह्यात वा राज्यात जावयाचे असल्यास त्या त्या जिल्ह्यातील वा राज्यातील सक्षम प्राधिकाऱ्यांची प्रवास व वाहनाबाबतची परवानगी घेणे आवश्यक आहे. लग्न समारंभ ज्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तेथील संबंधित पोलीस स्टेशनला  परवानगी अधिकारी यांनी अवगत करणे बंधनकारक आहे. परवानगी अधिकारी यांनी लग्न समारंभास परवानगी देतांना कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्गमित केलेल्या आदेशांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचा भंग झाल्यास  कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

......

The wedding will take place in the presence of only four people!

टिप्पण्या