Corona:लॉकडाऊन काळात प्राण्यांची घ्या काळजी!

लॉकडाऊन काळात प्राण्यांची घ्या काळजी!

छळ केल्यास होणार कायदेशीर कारवाई

अकोला,दि.१४: लॉक डाऊन काळात पशु, पक्षी व पाळीव प्राणी  यांचे देखभाल करणे, त्यांच्या अन्न व पाण्याची व्यवस्था करुन त्यांची उपासमार टाळण्यास नागरिकांनी प्राधान्य द्यावे तसेच या काळात प्राण्यांना मोकाट सोडून देणे, त्यांना मारहाण करणे असे कृत्य करुन छळ केल्यास तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत.

यासंदर्भात, माननीय सर्वोच्‍च न्‍यायालयामध्‍ये दाखल जनहित याचिकेच्या  दि. २१ एप्रिल २०२० च्या निकालपत्रात पशुपक्ष्‍यांची उपासमारी टाळणेबाबत आवश्‍यक कार्यवाही करणेबाबत निर्देशीत केलेले आहे.

           त्यानुसार भारतीय जीवजंतु कल्‍याण मंडळ(AWBI) यांनी लॉक डाऊन काळात प्राण्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांसाठी  सविस्‍तर सुचना दिलेल्‍या आहेत.

१.      पाळीव अथवा भटक्‍या प्राण्‍यांना अन्‍न व पाणी व्‍यवस्‍था करणाऱ्या व्‍यक्‍ती/स्‍वयंसेवकांनी स्‍वतःची स्‍वच्‍छता बाळगणे आवश्‍यक आहे.अन्‍न व पाणी व्‍यक्‍ती/स्‍वयंसेवकांना आवश्‍यकतेनुसार विशिष्‍ट वेळा(स्‍लॉट) उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात. तसेच या भटक्‍या प्राण्‍यांना अन्‍न व प्राणी देण्‍याची जागा सार्वजनिक हालचाल नसलेली असावी.

२.      भटक्‍या प्राण्‍यांना अन्‍न व पाणी व्‍यवस्‍था करणाऱ्या व्‍यक्‍ती/ स्‍वयंसेवकांनी स्‍थानिक प्राधिकरण, पोलिस विभागासोबत समन्‍वय राखावा व त्‍यांना सहकार्य करावे.  लॉकडाऊन च्‍या नियमांचे तसेच कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे उल्‍लंघन होणार नाही याची दक्षता घ्‍यावी.

३.      अन्‍न व पाणी पुरवठ्यानंतर खाण्‍याची भांडी, कागद, मास्‍क, ग्‍लोव्‍ज इत्‍यादी नष्‍ट करण्‍यासाठी कचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या मानकांचे पालन करण्‍यात यावे.

४.    नागरिकांनी भटक्‍या प्राण्‍यांना देण्‍यासाठी घरातील उरलेले अन्‍न कोठेही उघड्यावर टाकू नये.  प्राण्‍यांना अन्‍न देण्‍यासाठी विशिष्‍ट जागेची निवड करुन तेथे कचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या मानकांचे पालन होईल याची काळजी घ्‍यावी. कोरोना विषाणू(COVID-१९) च्‍या संसर्गामध्‍ये पाळीव प्राणी जसे, कुत्रे, मांजर, कोंबड्या इत्‍यादींचा सहभाग नसल्‍याबाबत स्‍थानिक प्राधिकरणामार्फत नागरिकांना प्रबोधन करावे.

५.     भटक्‍या प्राण्‍यांना अन्‍न व पाणी व्‍यवस्‍था करणाऱ्या व्‍यक्‍ती/स्‍वयंसेवक हे स्‍वयंस्‍फुर्तीने भारतीय संविधानातील कलम ५१अ(ग) नुसार नागरिकांनी करावयाच्‍या मुलभुत कर्तव्‍याचे पालन करीत आहेत.  त्‍यामुळे नागरिक तसेच स्‍थानिक प्राधिकरण यांना विनंती करण्‍यात येते की, त्‍यांना या कामासाठी सहकार्य करावे.

६.      विषाणूच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर प्राण्‍यांना रस्‍त्‍यावर मोकळे सोडुन विनाकारण प्राण्‍यांचे पालकत्‍वाचा त्‍याग करणे, त्‍यांचा छळ करणे व त्‍यायोगे प्राण्‍यांचे उपासमारीस कारणीभुत असणे तसेच अशा प्रकाराने अपघातामुळे त्‍यांच्‍या मृत्‍युस/अपंगत्‍वास कारणीभूत असणे या बाबी प्राण्‍यांना क्रुरतेने वागविण्‍यास प्रतिबंध अधिनियम १९६०, कलम ११(१) चे उल्‍लंघन करणाऱ्या आहेत.

७.लॉकडाऊन च्‍या काळामध्‍ये पाळीव अथवा भटक्‍या प्राण्‍यांचा छळ करणे, त्‍यांना कठीण वस्‍तुने, रॉडने मारहाण होत असल्‍याच्‍या तक्रारी या कार्यालयाकडे व भारतीय जीवजंतु कल्‍याण मंडळाकडे प्राप्‍त होत आहेत.  नागरिकांनी अथवा पशुपालकांनी कोणत्‍याही प्राण्‍यांना अशाप्रकारे अमानवी स्‍वरुपाची वागणूक देणे कायद्यानुसार गुन्‍हा आहे. असा प्रकार निदर्शनास आल्‍यास किंवा याबाबत तक्रार प्राप्‍त झाल्‍यास पोलिस प्रशासनाने याची तात्‍काळ दखल घेऊन या कायदयाच्‍या तरतूदी व तत्‍सम अधिनियमानुसार तात्‍काळ कारवाई करावी. याबाबत पोलिस यंत्रणेसह सर्व संबंधितांना  कार्यवाही करण्याबाबत निर्देशीत केले आहे,असे अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी आदेशात नमूद केले आहे.

......

टिप्पण्या