corona virus news:प्रभावित भागात सर्वेक्षण व चाचण्यांचा वेग वाढवा- पालकमंत्री बच्चू कडू

प्रभावित भागात सर्वेक्षण व चाचण्यांचा वेग वाढवा- पालकमंत्री  बच्चू कडू

अकोला,दि.११: कोरोना संसर्गाचे रुग्ण अकोला जिल्ह्यात विशिष्ट भागात वाढत आहेत. याच्या कारणांचा शोध घेऊन प्रभावित भागात घरोघरी सर्वेक्षण मोहिम राबवून संदिग्ध लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढवा व पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या व तपासण्या वाढवा असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांना दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. या संदर्भात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यांच्याकडून उपचार सुविधांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली. रुग्ण वाढण्याचे प्रमाण ज्या विशिष्ट भागात आहेत त्या भागात निर्माण केलेल्या कम्युनिटी क्लिनिक व  नमुने संकलन सुविधांची माहिती घेऊन यासाठी अधिक आवश्यकता असल्यास त्याबाबत विचारणा केली. अधिक चाचण्या व घरोघरी सर्वेक्षण करुन तपासणी करण्याचा वेग वाढवावा, जेणे करुन संपर्कातून होणारा संसर्ग कमी होईल, असे निर्देश त्यांनी दिले. डॉ. चव्हाण यांनी आरोग्य यंत्रणेमार्फत होत असलेल्या उपाययोजनांची व प्रयत्नांची माहिती ना. कडू यांना दिली. सध्याचा कालावधी हा समुह संसर्गाचा दिसत असून याबाबत आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनातील अन्य यंत्रणा उदा. पोलीस, मनपा इ. अधिक खबरदारी घेत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी  सांगितले.



टिप्पण्या