Corona virus news:अकोला बनला 'covid19' चा 'हॉटस्पॉट'!आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५०७

अकोला बनला  'covid19' चा 'हॉटस्पॉट'!

आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५०७

नीलिमा शिंगणे-जगड

अकोला,दि.२७ : covid19 मुळे अकोल्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात सर्वाधिक कोरोनाग्रस्तानची संख्या अकोल्यात आहे.  विदर्भातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात आता पॉझिटिव्ह रुग्ण संख्या  एकूण ५०७ झाली. 

बुधवारी (सायंकाळी सात वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३०८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३६ अहवाल निगेटीव्ह तर ७२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दुपारनंतर २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या पाच जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित २१ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५०७ झाली आहे.  तर आज अखेर प्रत्यक्षात १६४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ४६५८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४४०६, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ४६०७ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४३५५ तर फेरतपासणीचे ११० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४२ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ४१०० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ५०७ आहेत. तर आजअखेर ५१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज ७२ पॉझिटिव्ह

आज सकाळी  प्राप्त अहवालात ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. त्यात  १० महिला तर २० पुरुष रुग्ण आहेत. त्यातील १३ जण हे हरिहर पेठ येथील  रहिवासी आहेत. तर मोहता मिल प्लॉट नाजुकनगर,  मोठी उमरी,  गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल,  सहकार नगर, डाबकी रोड,  वृंदावन नगर,  देशमुख  फैल,  चांदखा प्लॉट वाशिम बायपास,  फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.

आज सायंकाळी प्राप्त  ४२ पॉझिटीव्ह अहवालात १९ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात  अकोट फैल येथील अकरा,  रामदास पेठ येथील पाच, माळीपुरा येथील पाच, मुर्तिजापूर येथील तीन, फिरदौस कॉलनी येथील दोन,  अशोक नगर येथील दोन, डाबकी रोड येथील दोन,  तर उर्वरित  महसूल कॉलनी, रजतपुरा,  गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम,  शिवसेना वसाहत, देशमुख फैल,  संताजीनगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी. मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक जण आहे.

२६ जणांना डिस्चार्ज

तर आज दुपारी  २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील २१ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित पाच जणांना घरी सोडण्यात आले. यात  नऊ महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे.

१६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ५०७  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २८ जण (एक आत्महत्या व २७ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर आज २६ जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ३१५  झाली आहे. तर सद्यस्थितीत १६४  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजअखेर ४३०७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २२७९ गृहअलगीकरणात तर १६५ जण संस्थागत अलगीकरणात  असे २४४४ जण अलगीकरणात आहेत. तर १७०७ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.  तर १५६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

तातडीची आढावा बैठक

जिल्ह्यातील वाढत्या रुग्ण संख्येबाबत  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज सायंकाळी उशीरा तातडीने आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यात उद्या(गुरुवार दि.२८)पासून  शहरात सुरु होणाऱ्या आरोग्य सर्वेक्षणात आढळणारे उच्च धोका पातळीतील तसेच संदिग्ध वाटणारे रुग्णांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त  संजय कापडणीस,  शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,डॉ. अष्टपुत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अकोला  शहरात मनपा हद्दीत  आरोग्य तपासणी मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तपासणीत जे व्यक्ती संदिग्ध वा उच्च धोकापातळीत  आढळतील त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात असलेल्या संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात  येईल. त्यासाठी  तेथील ६५०  बेडच्या क्षमतेचा वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.  या व्यक्तिंना तेथेच निरीक्षणात ठेवून जर लक्षणे आढळली तर तेथेच व्यवस्था करुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासले जातील. जर नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले जाईल. आणि अहवाल निगेटीव्ह आल्यास त्या व्यक्तीस घरी गृह अलगीकरणात ठेवण्यात येईल.  ही संस्थागत अलगीकरणाची व्यवस्था  डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वसतीगृह व अन्य इमारतींमध्ये सद्यस्थितीत आहेच. सध्या तेथे ६५० बेडची व्यवस्था आहे, या क्षमतेचा वापर करुन ही उपाययोजना राबवावी,  तसेच उद्या ( गुरुवार दि.२८) पासून मनपा हद्दीत प्रत्येक घरी प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी मोहिम राबविण्यात येईल. त्याची सुरुवात प्रतिबंधित क्षेत्रांपासून करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. सध्या भरतीया रुग्णालयात सुरु असलेले घशातील स्त्रावांचे नमुना संकलन केंद्र हे संस्थागत अलगीकरणाच्या ठिकाणी म्हणजेच पीकेव्ही येथे स्थलांतरीत करावे, असेही निर्देश देण्यात आले.

भरतीया रुग्णालयातील नमुने संकलन केंद्राचे पीकेव्हीत स्थलांतर

दरम्यान पीकेव्हीत संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या संदिग्ध वा जोखमीच्या व्यक्तींचे घशातील स्त्रावांचे कोरोना विषाणू चाचणी करिता संकलन करता यावे यासाठी भरतीया रुग्णालयात सुरु केलेले स्त्राव नमुना संकलन केंद्र आता पीकेव्हीत स्थलांतरीत करण्यात येऊन तेथे कार्यान्वित करण्यात येत आहे, ही कारवाई उद्याच पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.

संपूर्ण लॉकडाउनची मागणी

अकोल्यात सुरवातीला एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता.त्यामुळे फाजील आत्मविश्वास बाळगणारे नागरिक मोठया संख्येने टाळेबंदीतही घराबाहेर पडताना दिसले. या नागरिकाना ना स्वतःची काळजी, ना  प्रशासनाची शिस्त.नाही पोलिसांचा धाक. यामुळे covid19चा भयावह आलेख उंचावत गेला.  ५०० चा आकडा गाठायला ५० दिवस लागले.तर या दोनच दिवसात १०० रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. कोरोनाचे रुग्ण कमी न होता दिवसेंदिवस वाढतच आहे.एकाच दिवशी ७२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, ही बाब अकोला जिल्हा साठी निश्चितच चिंताजनक बनली आहे.याकरिता किमान पुढील ८ दिवस अकोल्यात संपूर्ण लॉकडाउन प्रशासनाने लागू करावे,अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

टिप्पण्या