Corona effect:खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू करावी...

खाजगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू करावी...
अकोला, दि.१ : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी  लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे. त्यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील सर्व खाजगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर्स आपले दवाखाने, रुग्णालये सुरु ठेवतील असे अपेक्षित होते. मात्र तसे होतांना दिसत नाही. अशा या आपत्तीच्या प्रसंगी खाजगी डॉक्टर्सने आपले दवाखाने, रुग्णालये तात्काळ सुरु करुन कोरोना संसर्ग प्रतिबंधाची उपाययोजना करुन रुग्णसेवा सुरु ठेवावी,अन्यथा खाजगी डॉक्टर्सच्या सेवा अधिग्रहित करण्याच्या पर्यायाचा अवलंब प्रशासन करेल असा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज झालेल्या डॉक्टर्सच्या बैठकीत दिला.
जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सने त्यांच्या सेवा सुरु करुन समाजात दिसणारे संशयित कोवीड रुग्ण ओळखून ते शासकीय रुग्णालयांकडे तात्काळ पाठवावे यासाठी आज बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक आय एम ए या डॉक्टर्सच्या संघटनेसमवेत झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता  डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषधे मेतकर तसेच अन्य अधिकारी व आय एम ए या संघटनेचे पदाधिकारी व डॉक्टर्स उपस्थित होते.
या बैठकीत सुरुवातीला उपस्थित डॉक्टरांनी आपल्या अडचणी मांडल्या.  तसेच त्यांनी केलेल्या सुचना व त्यांच्या समस्याही मांडण्यात आल्या.  यावेळी काही डॉक्टर्सने कम्युनिटी दवाखाने वेगवेगळ्या भागात सुरु करण्याबाबतचा उपायही सुचविला. तसेच ६० वर्षे वयावरील डॉक्टर्सना या अत्यावश्यक सेवेतून वगळावे, इन्श्युरन्स  सुरक्षा द्यावी , प्रतिबंधित क्षेत्रातील कर्मचारी वर्ग येऊ देण्याबाबत, अत्यावश्यक साहित्य व औषधे मिळण्याबाबत  निर्माण होणाऱ्या अडचणी याबाबत समस्या मांडल्या.
त्यांच्या समस्यांच्या तांत्रिक बाबिंबाबत जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. चव्हाण व अधिष्ठाता डॉ. घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. घोरपडे म्हणाले की, खाजगी डॉक्टर्सने समाजातील कोरोना रुग्ण ओळखून त्याच्या बाबत शासकीय रुग्णालयाला कळविण्याचे काम करावे. आपल्या रुग्णालयात काम करतांना त्यांनी मास्क, हॅण्डग्लोव्हज,सॅनिटायझर व कॅप वापरावे. ताप, खोकला, श्वास घेण्यात अडचण अशा लक्षणांचे रुग्ण आल्यास त्याबाबत कळवावे, जेणेकरुन त्यांचेवर वेळीच उपचार सुरु होतील. खाजगी डॉक्टर्स आपली सेवाही  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देऊ शकतात. सोबत या आणि शासनासोबत काम करा, असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण म्हणाले की, प्रशासन, शासकीय आरोग्य यंत्रणा, आणि खाजगी डॉक्टर्स यांनी सहकार्याने काम केल्यास आपण कोरोनाला हद्दपार करु शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनपा आयुक्त संजय कापडणीस म्हणाले की,  कोरोना रुग्णांचा शोध घेणे, त्यांचेवर वेळीच उपचार होणे यासाठी डॉक्टर्सने आपल्या ज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कोरोना व्यतिरिक्तही अन्य आजार आहेत? त्या रुग्णांना सेवा कशी मिळणार? समाजातील मधुमेह, अस्थमा, दमा अशा विकारांचे रुग्ण अधिक धोक्यात असतात. त्यांना संसर्गाची जास्त भिती असते. अशा रुग्णांना सेवा वेळीच दिली गेली पाहिजे. या सेवेकडे सामाजिक दृष्टीकोनातून बघावे, असे आवाहन त्यांनी केले. आपण आपल्या ज्ञानाचा वापर करुन  समाजाचे, रुग्णाचे मनोधैर्य वाढवू शकता, त्या जबाबदारीच्या भावनेतून काम करा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की,  खाजगी डॉक्टर्सना औषधे, सॅनिटायझर, साहित्य यांचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. डॉक्टर्सने आपला दवाखाना उघडणे आवश्यक आहे. काही डॉक्टर्स नावाला दवाखाना उघडून कंपाऊंडरला बसवून आलेल्या रुग्णांना परत पाठवत आहेत, हे अयोग्य आहे. कुठल्याही प्रकारे आलेला पेशंट जर संदिग्ध  रुग्ण वाटला तर त्याला वाऱ्यावर न सोडता त्याला शासकीय आरोग्य यंत्रणेच्या हवाली करणे ही आपली साऱ्यांची सामाजिक, नैतिक जबाबदारी व राष्ट्रीय कर्तव्य आहे. डॉक्टर्सने सुचविलेल्या कम्युनिटी दवाखाने या कल्पनेचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केले. ही कल्पना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे त्यांनी यावेळी उपस्थितांना आश्वासन दिले.  डॉक्टरांच्या अन्य मागण्यांबाबत शासनाच्या निर्देशानुसार कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी म्हणाले की, ज्या शहरात, जिल्ह्यात आपण शिकलो, वाढलो, अनेक वर्षे प्रॅक्टीस केली त्या शहराचे, समाजाचे आपण देणे लागतो या सामाजिक जाणीवेतून डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु करावेत. अन्यथा प्रशासनाकडे सर्व डॉक्टर्सची सेवा अधिग्रहित करण्याचाही पर्याय आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
या सभेचे संचलन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले

टिप्पण्या