कोरोना योद्धा युनूस शहा ईदच्या दिवशीही कर्तव्यदक्ष!

कोरोना योद्धा युनूस शहा ईदच्या दिवशीही कर्तव्यदक्ष!

अमरावती, दि. २५ : रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण. सगळे नागरिक यादिवशी कुटुंबासोबत राहून सण साजरा करतात. सध्या इर्विन रूग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी युनुस शहा हे मात्र रमजान ईदच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कार्यरत होते.

युनुस शहा हे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात पब्लिक हेल्थ नर्सिंगमध्ये कार्यरत आहेत. कोरोना प्रतिबंध उपचार व उपाययोजनांना सुरुवात झाल्यापासून संशयित व रुग्णांचा मागोवा, प्रयोगशाळेतील अहवाल सांख्यिकी, विविध यंत्रणांत समन्वय आदी विविध कामे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.  

त्यामुळे पहिल्या दिवसापासून युनुस हे कोविड रूग्णालयातील रुग्णांच्या तपशीलाचे वर्गीकरण, प्रयोगशाळांच्या अहवालांचे वर्गीकरण, सांख्यिकी, विविध यंत्रणांशी समन्वय साधणे अशी नानाविध कामे आपल्या गत तीन महिन्यांपासून सुट्ट्यांच्या दिवसासह दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अविरतपणे करत आहेत.

कोरोना रुग्णांचा उपचार, अहवालांचे वर्गीकरण व त्यानुसार माहिती शासनाला, आयसीएमआरला कळविण्याची कार्यवाही अशी कामे अचूकपणे व विहित वेळेत पूर्ण करावी लागतात. सतत नव्या माहितीची भर पडत असल्यामुळे ते अपडेट करताना खूप दक्षता घ्यावी लागते. कामाचा व्याप मनुष्यबळाच्या तुलनेत वाढला आहे. या काळात युनुसचे अविरत कार्य कौतुकास्पद ठरले आहे.

युनुस हे मूळ चांदूर बाजार येथील आहे. आज ईद असल्यामुळे घरी थांबण्याचा त्यांचा कुटुंबाचा आग्रह होता. मात्र, सध्याच्या कामाची गरज पाहता कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देऊन त्यांनी कामावर येणे पसंत केले व रात्री उशिरापर्यंत थांबून कार्यालयात सेवा दिली.

.........

टिप्पण्या