Artical:वंचीतांचा एल्गार महताब होवो...

वंचीतांचा एल्गार महताब होवो... 
फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर “ अकोला पॅटर्न “ जन्माला घालनारे एड. बाळासाहेब आंबेडकर वंचीत बहुजन आघाडीच्या निम्मीतीने डिप्रेस/ सप्रेस क्लासेसच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.१० मे रोजी साहेबांचा वाढदिवस आहे. हा दिवस राज्यभरात स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो.ह्या दिवसाला एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय सामाजिक कार्यकर्तृत्वाचा ओझरता आढावा घेणे संयुक्तिक ठरेल.बाळासाहेब आणि त्यांची चळवळ ही प्रबंधाचा विषय आहे, त्यामुळे केलेली मांडणी ओझरती आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे. 

 अशी झाली सुरुवात ... 

 १९८० साली सामाजिक क्षेत्रातून कार्यकर्ता  म्हणून सुरुवात करणा-या बाळासाहेबांचा जन्म १० मे १९५४ चा आहे.त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सेंट सँटेनिस लेंस हायस्कुल मुंबई मध्ये तर उच्च शिक्षण सिद्धार्थ महाविद्यालयात  झाले.आपल्या आजोबांच्या नावावर वारस म्हणून येणा-या नेतेपणाच्या तकलादू बाबी टाळून एक कार्यकर्ता म्हणून मला चळवळ करण्याचा अधिकार आहे, असे ठरवून सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरूवात केली. १९८२ साली मुंबईत बहिष्कृत हितकारीणी सभेच्या सुवर्ण महोत्सव मेळाव्यात त्यांनी सम्यक समाज आंदोलन स्थापन झाल्याची घोषणा केली.बाबासाहेबानी आपल्या राजकीय सामाजिक जीवनाची सुरुवात बहिष्कृत हितकारीणी सभेपासून केली होती.बाळासाहेबांनी बहिष्कृत हितकारीणी सभेच्या सुवर्ण महोत्सव मेळाव्यात आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. इतिहासाला कलाटणी देणारा हा दिवस ठरला.

बाबासाहेबांचा शेडूलड कास्ट फेडरेशन पक्ष नुसता दलीतांचा नव्हे तर सर्व भारतीयांचा असावा म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली.त्यांचे हयातीत पक्ष स्थापन होऊ शकला नाही.त्यांचे महापरिनिर्वाणा नंतर स्थापन झालेला पक्ष पुन्हा एक जातीय आणि एककल्ली ठरला होता.नेतृत्वाचे वाद, अनेक गटाचा उदय आणि १९७० च्या दशकात उदयास आलेले दलित पँथरचे वादळ १९७७ साली शमले होते.त्यातही १९७७ साली  'भारतीय दलित पँथर' निर्माण झाले.परंतु समाजाला एकसंघ पक्ष नव्हता , नेतृत्व उभे झाले नव्हते.बाळासाहेबांनी सम्यक समाज आंदोलनाचे माध्यमातून २ मार्च १९८३ रोजी नाशिक मधून स्त्रियांचे प्रश्न, भूमिहीन शेतकरी शेतमजुरांच्या साठी मुंबई विधान भवनावर पायी मोर्चा काढला.मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले पाहिजे.वाढत्या महागाईला विरोध, भूमिहीन शेतमजुरांना पडक्या जमिनी देण्यात याव्यात,नवबौद्ध आणि आदिवासींना सवलती देण्यात याव्यात ह्या मोर्च्याच्या मागण्या, दादासाहेब गाईकवाडांच्या भूमिहानाच्या लढ्याची आठवण करून देणारे आंदोलन होते.ह्यातून आंबेडकरी चळवळीने एकजातीय राजकारणातून मुक्त होऊन सर्वसमावेशक प्रश्नावर लढण्याची सुरुवात केली.

शेकाफे व रिपब्लीकन पुढा-यांनी पक्ष आणि स्वतःचे नेतृत्व काँग्रेसच्या दावणीला बांधले होते. त्या मुळे महाराष्ट्रात जातीय अन्याय अत्याचारांनी उचल खाल्ली होती.प्रभावहीन झालेल्या चळवळीला उभारी देण्यासाठी बाळासाईब आंबेडकरांनी  २७ नोव्हेंबर १९८३ रोजी सिद्ध्यर्थ विहार वडाळा येथे काही समविचारी मंडळींना निमंत्रित करून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्याचा निर्णयावर सखोल चर्चा केली.आणि ६ मी १९८४ साली पूणे येथील नानापेठेतील अहिल्याश्रम येथे अधिवेशन बोलाविले.ह्याच अधिवेशनात भारतीय रिपब्लिकन पक्ष ह्या राजकीय पक्षाची बांधणी केली.ह्या अधिवेशनाचे वैशिष्टय म्हणजे ह्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मिनाबाई गायकवाड ह्यांनी भूषविले होते.सम्यक समाज आंदोलन ते भारतीय रिपब्लिकन पक्ष हे आवर्तन पूर्ण झाले होते. 
१९८३ मध्ये त्यांनी शेतक-याचा गायरान जमिनीचा लढा उभा केला.वसंत दादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी गायरान जमिनीसाठी मोर्चा काढला.हे मोर्चे आंदोलन सुरु होते, भुमिहीनांचे मोर्चे काढल्याने १४ एप्रिल १९९० साली सुधाकरराव नाईक मंत्री मंडळाने गायरान जमिनीचा शासन निर्णय बाळासाहेबांचे नावाने काढला आणि गायरान जमिनी मिळण्याचा प्रश्न मार्गी लागला, भूमिहीनाना जमिनीचे पट्टे मिळाले. 
 १९८५ साली त्यांनी ऊस उत्पादक शेतका-या साठी पूणे ते माणगाव लॉंगमार्च काढला.साखर कारखाने केंद्रबिंदू न धरता ऊस उत्पादक शेतकरी केंद्रस्थानी असावा ही मुख्य मागणी होती.ह्या आंदोलनामुळे शेतक-यांना उसाला योग्य भाव मिळाला आणि साखर कारखान्यातील राखीव जागा भरल्या गेल्या. 

 अकोला जिल्ह्याचा ऋणानुबंध  –

१४ ऑगस्ट १९८० ला विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नातू एड. बाळासाहेब आंबेडकरांचे अकोल्यातील सर्किट हाऊस येथे प्रथमच आगमन झाले होते. कृष्णा इंगळे व एक रेल्वे कर्मचारी त्यांचे सोबत होते.नगर परिषद येथे आयोजित बाळासाहेबांचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द झाला होता.ही बातमी अकोल्यातील तत्कालीन नेतृत्व दिनबंधू गुरुजी, केरुबुवा गायकवाड ह्यांचे कार्यकर्ते लंकेश्वर गुरुजी, गुणवंतराव पाटील,पी. आर. महाजन,शत्रुघन मुंडे, कृष्णराव मोहोड, यादवराव पाटील व भाऊसाहेब इंगळे ह्यांना समजली.बाबासाहेबांचे नातू अकोला जिल्ह्यातून सभा न होता परत जाणे ही आपल्या जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब आहे, हे हेरून त्या सर्व कार्यकर्त्यानी दुपारी बाळासाहेबांची भेट घेतली.रात्री ८ वाजता अकोट फैल येथे सभेची निश्चिती झाली.तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता भीम नगर येथे तत्कालीन जुने पुढारी शंकरराव खंडारे ह्यांचे घरी बाळासाहेबाना नेण्यात आले.साक्षात बाबासाहेबांचे नातूच मोहोल्यात आल्याने बाळासाहेबांना पहायला तोब्बा गर्दी झाली.प्रत्येकाला ह्या तरण्याबांड आंबेडकरां मध्ये बाबासाहेबच दिसत होते.भारावलेली जनता डोळे भरून हे प्रतिरूप पाहत होते.त्यांच्या पाया पडत होती, त्यांना स्पर्श करत होती, त्यांच्या पायाची माती कपाळावर लावत होती.सर्व आसमंत भारवला होता.ह्या प्रचंड गर्दीत पहिली सभाच भीमनगर मध्ये पार पडली.अर्थातच त्या नंतर रात्री ८ वाजताची नियोजित सभा भारतीय बौद्ध वाचनालय अकोट फैल येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाली.
दरम्यान अकोला जिल्ह्याला भारावून टाकणारा एक प्रसंग घडला होता तो अगदी पहिल्याच धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यात.ह्या पहिल्या सोहळ्यात मीराताई आंबेडकर ह्या भाषणासाठी उभ्या राहिल्या ,त्यांनी सांगितल की “ बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे काही कमवलं ते सर्व समाजाला देवून टाकलं, माझ्या कडे बाबासाहेबांनी कमाविलेल्या संपत्तीचे काहीही नाही.परंतु आज समाज आंबेडकर कुटुंबांकडे प्रचंड आशेने पाहतो,माझ्या कडे बाबासाहेबांची संपती नसली तरी माझ्या कडे बाबासाहेबांचा नातू आहे आणि तो मी आज समाजाच्या ओटीत टाकते ....” सभा स्तब्ध झाली, मीराताईंच्या भाषणाने उपस्थित समूहाच्या काळजाचा वेध घेतला. जनतेच्या डोळ्यात अश्रू तराळले.टाळ्यांचा कडकडाटात बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा स्विकार केला गेला.आणि नेता, पक्ष, संघटना फिनिक्स पक्षा प्रमाणे झेपावली.पुढच्या काळात ’बहुजन सारे एक होवू सत्ता आपल्या हाती घेऊ ‘हा नारा देत सत्ताबाह्य समूहाला सत्ताधारी होण्याचा राजमार्ग प्रशस्त करणा-या ‘अकोला पॅटर्नने’ जन्म घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटा वरील अनेक प्रस्थापितांना सत्तेतून बेदखल केले.आणि बहुजनांची सत्ता प्रस्थापित केली.ह्यात अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांचे मोलाचे योगदान आणि आंबेडकर कुटुंबाची ३८ बहुमुल्य वर्ष आहेत हे विसरता येणे शक्य नाही.
या प्रसंगा नंतर बाळासाहेबांशी जुळलेल्या कार्यकर्त्यानी लगेच दोन महिन्यात बाळासाहेबांची सभा ११ ऑक्टोबर १९८० रोजी अकोट येथील खरेदी विक्री संघाच्या पटांगणावर घेतली.त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला.त्या मुळे वातावरण निर्मिती झाली.भारावलेले कार्यकर्ते संपूर्ण ताकदीने कामाला लागले आणि खिशात पैसा, साधने, मोटर वाहने किंवा साधा लाऊडस्पिकरची सोय नसताना केवळ चळवळ मोठी झाली पाहिजे ह्या ध्यासाने खेडोपाडी, वस्त्यांमध्ये सायकलवर फिरत अकोला जिल्हा बांधू लागले, गाजवू लागले.
तसा अकोला जिल्हा चळवळीचा बालेकिल्लाच होता..डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा भारताच्या सामाजिक राजकिय क्षितिजावर नेतृत्व उदय झाल्यानंतर त्यांचे पाठीशी हा जिल्हा प्रचंड ताकदीने उभा झाला.आंबेडकरी चळवळीतील कलापथके,गीतकार, शाहीर, जलसे, कलापथके, धंडारी,भजनी मंडळानी जागृतीचा वणवा सतत पेटत ठेवला होता.शेड्यूल कास्ट फेडरेशनचे व-हाड प्रांतिकचे ९ व १० डिसेंबर १९४५ ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत अकोल्यात भरले होते.भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, शेकाफे चे कार्य मोठ्या गतीने सुरु होते.भय्यासाहेब आंबेडकरांनी देखील पाच वेळा ह्या जिल्ह्याचा दौरा केला होता.तसेच रिपब्लिकन पक्षाच्या प्रेसिडीयमची पहिली बैठक देखील २८,२९ व ३० डिसेंबर १९५७ साली अकोल्यातच संपन्न झाली होती.बाबासाहेबांच्या बौद्ध धम्म स्विकाराच्या आवाहना नुसार १००% बौद्ध धम्म स्वीकारणारा जिल्हा अकोलाच आहे.१९०१ सालच्या जनगणनेत एकही बौद्ध धर्मीयांची नोंद नसलेल्या अकोला (वाशीम संयुक्त) जिल्ह्यात १९५६ ला धम्म स्वीकाराच्या नंतर १९६१ च्या जनगणनेत दोन लाख बेचाळीस हजार चारशे चौसष्ट बौद्ध धर्मीयांची संख्या नोंदविण्यात आली होती.एवढी प्रचंड आंबेडकरी निष्ठा असलेला जिल्ह्या म्हणून अकोल्याचा लौकिक होता.त्या मुळे हे तरूण आंबेडकर पहिल्याच दिवशी नेते म्हणून स्विकारले गेले.भारतीय बौद्ध महासभेचे कार्य व महाउपासिका मीराताई आंबेडकर व बाळासाहेबांचा राबता ह्या जिल्ह्यात वाढविण्यात तत्कालीन पदाधिकारी कार्यकर्ते यशस्वी झाले.

भारिपचे विलीनीकरण .. 

महाराष्ट्रातील विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्र करून एक प्रचंड मोठी राजकीय शक्ती निर्माण करण्यासाठी १९९० साली अकोला जिल्हा निवडला.१९९० साली मूर्तिजापूर विधानसभेत अपक्ष उभे असलेल्या मखराम पवारांना पाठिंबा देऊन निवडून आणले.हा बहुजन समाजाच्या विजयाचा मानदंड ठरला."बहुजन सारे एक होऊ सत्ता आपल्या हाती घेवू" हा नारा बुलंद झाला.पवारांच्या विजया मुळे प्रस्थापित व्यवस्थेला पराभूत करता येते हे आत्मभान बहुजन समाजाला प्राप्त झाले.२३ ऑगस्ट १९९० साली अकोला शहरातील प्रमिलाताई ओक हॉल येथे बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.बहुजन समाजाचे स्वतंत्र संघटन उभे करणे हा त्या मागील मूळ उद्देश.ह्या मेळाव्यात "अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघाची" स्थापना झाली, याच अधिवेशनात अकोला जिल्हा बहुजन समाज महासंघ हा भारिप सोबत राजकीय आणि सामाजिक वाटचाल करेल हे ठरविण्यात आले.
त्यातूनच बहुजनांच्या सत्तेचा स्वबळाचा मार्ग यशस्वी करणारा 'अकोला पॅटर्न' जन्माला आला.हाच बाबासाहेबानी अपेक्षिलेला रिपब्लीकन पक्ष होता. 
बहुजन महासंघाच्या स्थापने नंतर भारिप बहुजन महासंघाच्या विलीनीकरणाचा पहिला एपिसोड पार पडला तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील अधिवेशनात.२१ मार्च १९९३ साली शेगांव येथे बहुजन महासंघाचे अधिवेशन मखराम पवारांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.ह्या अधिवेशनाला  बाळासाहेब आंबेडकर उद्घाटक होते.प्रमुख पाहुणे म्हणून सिने कलावंन्त निळू फुले आणि राम नगरकर प्रामुख्याने उपस्थित होते.ह्याच अधिवेशनात भारिप आणि बहुजन महासंघाचे विलीनीकरण झाले.हे दलितांच्या राजकीय सामाजिक चळवळीचे दुसरे आवर्तन नव्या आयामाला जन्म देत होते. एकजातीय, एक धार्मीय राजकीय कूस त्याने मोडून निघाली.
भारिप बहुजन महासंघाच्या उदयाचे पहिल्या टप्यात बाळासाहेबांचे नेतृत्वातील भारिप बमसंने आपला पहिला आमदार नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये भीमराव केराम ह्यांचे रुपाने निवडून आणला.आणि बघता बघता बहुजनाना सत्तेची दालने बाळासाहेबांनी उघडी करून दिली.ह्या नंतर महाराष्ट्रात झंझावात निर्माण केला.त्यातून अनेक लहान लहान घटकांना विविध ठिकाणी सत्तेची पदे मिळालीत.विविध आंदोलने आणि मोर्चे ह्यांनी तो काळ प्रचंड गाजला होता.त्यात खो घातला तो शरद पवारांनी, भारिप बमसंचा पहिला आमदार फोडण्या पासून ते सत्तेतील भारिप बमसंचे मंत्री फोडण्याचे काम पवारासोबत काँग्रेसने केले. त्या वेळी बाळासाहेबांनी दिलेले भाषण शरद पवारांना मोठा धडा होता, " तुम्ही माझे मंत्री आमदार पळवू शकता, परंतु जनता नाही ".हे वाक्य प्रचंड आश्वासक होते. मराठवाडा विध्यापीठाचे नामांतर असो की रिडल्स बाळासाहेबांनी कधीही शरद पवारांवर किंवा काँग्रेसवर विश्वास ठेवला नाही. 

वंचित प्रयोगाचे दूरगामी परिणाम ... 

आताच्या लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडी ही राजकीय चमत्कार आहे.२४ मार्च २०१९ रोजी नोंदणी झालेला पक्ष राज्यात ४८ जागा स्वबळावर उभ्या करून लढतो काय आणि कुणीही स्पर्धेत धरत नसताना अल्पावधीत राज्यात प्रस्थापित पक्षांचा विरोधात तिसरा सक्षम पर्याय निर्माण होतो काय, सर्वच अनाकलीय आहे.प्रस्थापित राजकीय घराणी आणि पक्ष व नेत्याच्या उरात धडकी घडविणारी ताकद बाळासाहेबांनी वंचीत बहुजन आघाडीच्या रूपाने उभी केली आहे.सर्व बहुजन समाजाने देखील हा पक्ष आणि नेता स्वीकारला आहे.त्यामुळे आता खरे लोकशाहीचे विकेंद्रीकरण होऊन सत्ता वंचीताचा उत्कर्ष होईल. बाळासाहेबांचे नेतृत्वात लोकसभेच्या ह्या दमदार प्रदर्शना नंतर विधानसभेत वंचीतने दखल घ्यायला भाग पाडले.नंबर गेम मध्ये दिसत नसले तरी ही २०२४ ची पायाभरणी आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात तसे 'राजकारण हा धीराचा खेळ आहे'.राजकारण करताना यश अपयश पचवायला ताकद लागते.यशाने बेभान व्हायचे नसते तसेच अपयशाने निराश देखील व्हायला नको. 
बहुजनांच्या राजकीय सामाजिक चळवळीचा वेलू परिवर्तनाच्या मांडवावर नेणा-या बहुजन नायक एड बाळासाहेब आंबेडकरांना वाढदिवसा निमित मंगल कामना.       
              
राजेंद्र पातोडे
(प्रदेश प्रवक्ता) 
वंचीत बहुजन आघाडी 
महाराष्ट्र प्रदेश 
९४२२१६०१०१

टिप्पण्या