- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पीक कर्जासाठी हमीपत्राची सक्ती नको-जिल्हाधिकारी
संग्रहित छायाचित्र
जिल्ह्यातील सर्व बॅंकांना निर्देश
अकोला,दि.१९: लॉकडाऊन व संचारबंदीच्या काळात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून १०० रुपयाच्या अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या स्टॅम्प पेपरवर हमी पत्र घेण्याची सक्ती करु नये. तसेच कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व बॅंकांना दिले आहेत.
यासंदर्भात दिलेल्या लेखी निर्देशात जिल्हाधिकारी पापळकर यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांनी सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मुद्रांक अधिनियम कलम १७ नुसार आवश्यक दस्तांचे शुल्क लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर कामकाज सुरु झाल्यावर भरले तरी ते मुदतीत भरले असे मानले जाते. अशाही परिस्थितीत शुल्क भरणे शक्य नसल्यास कलम ४० प्रमाणे अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८९ नुसार गहाण वा कर्ज व्यवहारात ३० दिवसांचे आत व्यवहाराचे दस्त जमा करणे आवश्यक आहे तथापि ३० दिवसांची कालमर्यादा कार्यालय बंद कालावधीत संपुष्टात आली असल्यास लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर म्हणजेच कार्यालय पुन्हा सुरु झाल्यावर दस्त जमा करता येतील. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांच्या या निर्देशानुसार सर्व बॅंकांनी पीक कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून १०० रुपयांच्या वा अधिक रकमेच्या हमीपत्राची सक्ती करु नये. सर्व शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.
......
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा