Agriculture:शेतीच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ करुन अहवाल द्यावा-बच्चू कडू

शेतीच्या  नुकसानीचे पंचनामे  प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ करुन अहवाल द्यावा-बच्चू कडू

अकोला,दि.११ : जिल्ह्यातील काही भागात रविवार १० मे रोजी सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस व काही ठिकाणी गारपीटीमुळे फळबाग व शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे  प्रशासकीय यंत्रणेने तात्काळ करुन अहवाल द्यावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले आहेत.

रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला. त्यात अकोट तालुक्यातील अकोल खेड व पणज मंडळात गारपीटीने संत्रा व केळी बागांचे तसेच  कांदा, गहू व काही ठिकाणी भुईमुग या पिकांचे काढणी पश्चात नुकसान झाल्याची माहिती आहे. कृषि विभागाने काल दुपारीच दोन तास आधी स्कायमेट संस्थेकडून आलेला संदेश शेतकऱ्यांना पाठवला होता. त्यानंतर लगेचच दुपारी चार वाजेच्या सुमारास गारपीट व विजा व जोरदार वाऱ्यांसह पावसास सुरुवात झाली. या पावसानंतर निर्माण झालेली  शेतावरील परिस्थिती शेतकऱ्यांनीही कृषि विभागाकडे मोबाईलद्वारे कळविली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी यांना तात्काळ पाहणी करुन प्राथमिक अहवाल पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच ज्या ज्या शेतकऱ्यांनी फळबाग विमा योजनेचे संरक्षण घेतले असेल त्यांच्याबाबत विमा कंपन्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच कांदा, भुईमुग व गहू या पिकांचे काढणी पश्चात नुकसान झाले असल्यास   स्वतंत्र पंचनामे करावे तसेच विमा संरक्षण असल्यास पंचनामे विमा कंपन्यांनी तात्काळ करावे असे आदेश कृषि विभागाने दिले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले.

दरम्यान आज दिवसभर नुकसानग्रस्त भागात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन नुकसानीचे संयुक्त पंचनामे सादर करावे असे निर्देश कृषि विभागाने दिले आहेत. याबाबत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी  तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून सर्व संबंधित यंत्रणांनी नुकसानग्रस्त भागाचे संयुक्त पंचनामे करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

१६९५ हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज

दरम्यान रविवारी सायंकाळी झालेल्या पाऊस व गारपीटीमुळे  अकोट तालुक्यातील पाऊस व गारपीटग्रस्त गावांमधील १६९५ हे. आर. क्षेत्रावरील  पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात केळी ५७५ हेक्टर, संत्रा बाग ८५० हेक्टर, लिंबू ९५ हेक्टर,  कांदा ७५ हेक्टर, उन्हाळी भुईमुग ८० हेक्टर, भाजीपाला २० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. प्रत्यक्ष पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती  कृषि विभागाने दिली आहे. या नुकसानीत अकोट तालुक्यातील दहा गावातील संत्रा,केळी, लिंबु, कांदा, भुईमुग या पिकांचा समावेश आहे, असेही कळविण्यात आले आहे.

नुकसानग्रस्त गावात अकोलखेड मंडळ मधील अकोलखेड,आंबोडा, मोहाला, धारुळ रामापूर, सुकली, राहणापुर, शहानूर, मलकापूर,पोपटखेड,आमोणा,केलपाणी,गुल्ललघाट,सोमठाणा,कोहा,कुंड,बोरी इ. १८ गावांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

टिप्पण्या