मन करा रे प्रसन्न, भेदा कोरोनाचे संक्रमण

मन करा रे प्रसन्न, भेदा कोरोनाचे संक्रमण

अकोल्यात औषधोपचारासोबत प्रभावी ठरतायेत मानसोपचार

अकोला,दि.१८ : मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण |मोक्ष अथवा बंधन | सुख समाधान इच्छा तें | -संत तुकाराम.

संत तुकारामांसारख्या द्रष्ट्या कविने मनाची ही महती वर्णली आहे. कोरोना विरुद्धचे युद्धही जर मनाने ठरवले तर  आपण हवी ती अवस्था प्राप्त करु शकतो. एखाद्या आजाराविरुद्ध निश्चितच जिंकू शकू. हा ठाम विश्वास एरवी आपण बोलतांना व्यक्त करतो खरा, पण ज्याला प्रत्यक्ष कोरोना लागण होत असेल त्याची मनोवस्था कशी असेल? तो किती खचून जात असेल?  अशा या खचलेल्या मनोवस्थेत त्याचे शरीर औषधोपचाराला कितपत साथ देत असेल? म्हणूनच औषधोपचारासोबत मानसोपचार देऊन रुग्णाच्या मनाला उभारी आणून फेरतपासणीत पॉझिटीव्ह रुग्ण निगेटीव्ह करण्याची किमया अकोल्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी साधलीय.

अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व सर्वोपचार रुग्णालयात मिळून  कोरोना संदिग्ध रुग्ण व तपासणी अंती पॉझिटीव्ह आढळलेले रुग्ण यांच्यावर उपचार केले जात आहेत. सध्या रुग्णालयात ७२  संदिग्ध रुग्ण दाखल आहेत. १२ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार विभागप्रमुख डॉ. शिल्पा तेलगोटे यांनी मानसोपचार करण्यात मौलिक भुमिका बजावली.

भय, न्यूनगंड आणि राग सुद्धा

त्यांनी सांगितले की,  कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह अहवाल आला की, रुग्ण मनातून खचलेला असतो. या आजाराबद्दल रुग्णाला त्या- त्या सामाजिक, कौटूंबिक पार्श्वभुमीनुसार वेगवेगळे समज असतात.  काही जण स्वतःला दोष देतात. काही खूप घाबरलेले असतात. तर काही अगदी नॉर्मलही असतात.

इथं आल्यावर संबंधित व्यक्तीच्या जीवनशैलीत बदल होतो. कारण दैनंदिन घरगुती जीवन आणि रुग्णालयातील अलगीकरण वा विलगीकरण या अवस्थेतील जीवन यात फरक असतोच. त्यामुळे बरेच जण रागावलेलेही असतात. काहींना तर ही आपल्याला शिक्षाच आहे असेही वाटते. तर काही खूप अस्वस्थ असतात.  यातूनच मग काही जण आरडाओरडा करतात. उपचार, जेवण इ. घेण्याचे नाकारतात.

समुपदेशनातून सकारात्मकतेकडे

अशा या रुग्णांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी समुपदेशन करण्याचा निर्णय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने घेतला.  या समुपदेशनात प्रथमतः रुग्णाचा अपराध गंड दूर केला जातो. ‘या आजाराचे संक्रमण कुणालाही होऊ शकते. आपण कोणतीही चूक वा चुकीचे कृत्य म्हणून हा आजार होत नाहीय. हा आजार म्हणजे शिक्षा नाहीय’, या मुद्यांवर भर दिला जातो. तसेच रुग्णाला धीर देऊन त्यांना या आजाराविषयी तथ्य सांगितली जातात. ‘या आजाराचा मृत्यू दर हा केवळ  दोन टक्के असून आपण उरलेल्या ९८ टक्क्यांतील आहोत’, हे सांगण्यात येते. त्यामुळे आपण हमखास बरे होणार असा विश्वास निर्माण करण्यात येतो.

हा आजार या आजारामुळे करावे लागलेले अलगीकरण वा विलगीकरण हे आपल्या संयमाची परीक्षा आहे असे समजून त्यांनी धीर राखावा. अलगीकरण वा विलगीकरण म्हणजे शिक्षा नसून आपल्याच कुटूंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी  ते आवश्यक असल्याचे रुग्णाला पटवून दिले जाते.

अकोल्यात दाखल असलेले पॉझिटीव्ह १२ तर  अन्य २५ जणांना या पद्धतीने समुपदेशन देण्यात आले. दोन जणांची मानसिकता खूप खालावली होती त्यांना अस्वस्थता व न्यूनगंड निवारणाची औषधेही द्यावी लागली, असे डॉ. तेलगोटे यांनी सांगितली. त्या म्हणाल्या की, समुपदेशन देतांना किमान सामाजिक अंतर राखून व सुरक्षा साधनांचा वापर केला जातो. मुळातच पेशंट मध्ये हा विश्वास निर्माण करणे, हा कालावधी तात्पुरता असून लवकरच हा काळ जाईल, आपण सुखरुप आपल्या घरी परतू, आपण कोरोनामुक्त होऊच हा विश्वास मनात निर्माण करण्यावर भर दिला जातो. सद्यस्थितीत अकोल्यातील १२ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी फेर तपासणीत ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर आठ जण हे क्वारंटाईन मधून घरी सोडण्यात आले आहेत. अर्थात हे सगळं वैद्यकीय चाचण्यांनंतरच. मात्र या कालावधीत रुग्णाला वा  संशयित रुग्णाची मनोवस्था उंचावून त्याचे धैर्य एकवटण्यात मानसोपचाराची मोठी भूमिका आहे, यात शंका नाही.

घरी परतलेल्यांची मानसिकता कशी जोपासाल?

जे बरे होऊन घरी परततात त्यांना किंवा ज्यांचा क्वारंटाईन कालावधी समाप्त होऊन घरी जातात तेव्हा घरच्यांनी व समाजातील अन्य लोकांनीही त्यांच्याशी अशाच सकारात्मक पद्धतीने वागणे गरजेचे आहे. घरी सुद्धा या रुग्णांनी किमान एक महिना स्वतःला अलग ठेवणे आवश्यक असते. अशावेळी त्याला सतत त्याला वेगळं ठेवत असल्याची जाणीव करुन देऊ नये.  त्याच्याशी जरी अंतर राखून संवाद राखणे, व्यवहार करणे हे आवश्यक असले तरी त्याला त्याची जाणीव करुन देऊ नये. त्याला चांगले संगीत, वाचन इ. एकट्याने करता येतील असे छंद जोपासू द्यावे, त्याचे मन प्रसन्न व चित्तवृत्ती प्रफुल्लीत राहतील असे वातावरण ठेवावे, असेही डॉ. तेलगोटे यांनी सांगितले.

टिप्पण्या