कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना;शहरी भागातील आठवडी बाजार राहणार बंद

शहरी भागातील आठवडी बाजार राहणार बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना

 शहरी भागातील आठवडी बाजार राहणार बंद

अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश

उघड्यावर मांस विक्री व विल्हेवाटीस प्रतिबंध



अकोला; कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यासोबतच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थांमधून प्रवाशांची हात धुण्याची व्यवस्था व  बसेस, रेल्वे आदींच्या निर्जंतूकीकरणाबाबत व्यवस्था करावी, उघड्यावर मांस विक्रीस तसेच अवशेषांच्या विल्हेवाट उघड्यावर करण्यास, अफवा व अनधिकृत माहिती प्रसारास प्रतिबंध लागू करण्याचे निर्देश  तसेच शहरी भागात गर्दी टाळण्यासाठी शहरी हद्दीतील आठवडी बाजार एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज मंगळवारी(17मार्च) दिले.

दरम्यान आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. तथापि,विदेशातून आलेल्या एकूण ४६  प्रवाशांपैकी ३६ जणांना गृह विलगीकरण (होम क्वारंटाईन) करुन ठेवण्यात आले आहे. तसेच उर्वरित प्रवाशांपैकी चौघे हे अमरावती येथे आहेत.  एक प्रवासी नागपूर येथे आहे  ते अद्याप अकोला जिल्ह्यात आलेले नाहीत तर उर्वरित पाच जणांशी संपर्क सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली.  दरम्यान काल (दि.१६) ज्या व्यक्तीचे नमुने पाठविण्यात आले होते ते निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज अखेर एकही संशयित रुग्ण आढळून आला नाही. तथापि सर्व नागरिकांनी कटाक्षाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहतुक व्यवस्थांमधून स्वच्छता व निर्जंतूकीकरण
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून  महानगरपालिका आयुक्त,  राज्य परिवहन महामंडस्ळ अकोला विभागाचे विभाग नियंत्रक व मुख्य प्रबंधक अकोला रेल्वे स्थानक यांना व्यवस्था करावयास निर्देशित करण्यात आले आहे. त्यासाठी  राज्य परिवहन महामंडळ तसेच  खाजगी लक्झरी बसेसच्या बसस्थानकांवर  प्रवाशांसाठी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी, कोणताही प्रवासी बसमधून उतरल्यावर अथवा बस मध्ये चढण्याआधी  हात धुतील याची खबरदारी घेऊन व्यवस्थेची सज्जता ठेवावी, असे निर्देश दिले.  तसेच बसेसचे वेळचे वेळी निर्जंतूकीकरण  करुन बसेसच्या स्वच्छतेबाबत खबरदारी  घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार करोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्ती वा संस्थेस अनधिकृतरित्या  कोरोना विषाणू प्रादुर्भाव वा त्यासंदर्भात कोणतीही माहिती, अफवा पसरविण्यास, प्रसारित करण्यास प्रतिबंध केला असून  अशी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध  भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही दिला आहे.
या संदर्भात अधिक्रृत माहिती आयुक्त आरोग्य सेवा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक, आरोग्य सेवा मुंबई,  संचालक आरोग्य सेवा पुणे, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी हेच प्रसारित करतील असे निर्देश देण्यात आले आहेत.

उघड्यावर मांस विक्री व विल्हेवाटीस प्रतिबंध
अकोला जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात उघड्यावर मांस विक्री  तसेच जिवंत वा मृत कोंबड्यांची विल्हेवाट सार्वजनिक ठिकाणी करण्यास  साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  नुसार प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.

शहरी भागातील आठवडी बाजार बंद
याच संदर्भात लोकांची गर्दी टाळण्यासाठी  नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका, शहरी भागात भरणारे आठवडी बाजारही एक आठवड्यासाठी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी आज दिले आहेत. त्यानंतर बाजार सुरु करण्याचे आदेश स्वतंत्रप्रमाणे निर्गमित करण्यात येतील असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. तसेच शहरी भागातही अनेक लोकांची गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी,असे निर्देशही पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे.

लग्नसमारंभ आयोजकांना आवाहन
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे सावट असतांना ज्यांच्याकडे विवाह समारंभांचे आयोजन नजिकच्या काळात आहेत अशा लोकांनी आपल्याकडील समारंभ पुढे ढकलावेत अन्यथा मोजक्या  लोकांच्या उपस्थितीत पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

जिल्हा रुग्णालयात समुपदेशन;जिल्हाधिकारी कार्यालयात निर्जंतूकीकरणाची सुविधा
कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे सावट असतांना जिल्हा सर्वोपचार रुगणालयात समुपदेशन व माहिती कक्ष सुरु करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या लोकांना कोरोना संसर्गाबाबत माहिती व समुपदेशन देण्यात येईल. सकाळी आठ वाजल्यापासून ते बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज आटोपेपर्यंत हा कक्ष कार्यान्वित राहणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सॅनिटायझर
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे स्वतः व त्यांच्या कडे येणारे अभ्यागत व कामकाजानिमित्त येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करुन त्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे दालनात जाणारा प्रत्येक व्यक्ती हा आपले हात निर्जंतूक करुनच आत जात आहे.

टिप्पण्या