प्रहारचे तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरात गोळीबार

प्रहारचे तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहरात गोळीबार

प्रकृती गंभीर;अकोल्यात उपचार सुरू

अकोटात तणावाचे वातावरण

अकोला:प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी अकोला जिल्हाअध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर  21 फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास अकोट शहर पोलीस स्टेशन परिसरात  गोळीबार करण्यात आला. या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

   अशी घडली घटना

प्रहार जनशक्तीचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हे अकोट शहर पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटना स्थळावरून पळ काढला. माहिती मिळताच अकोट शहर पोलिसांनी घटना स्थळावर धाव घेऊन पुंडकर यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटना स्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली. याप्रकरणी अकोट शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अकोटात प्राथमिक उपचार

अकोट ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोल्याला हलविण्यात आले आहे.ग्रामीण रुग्णालयात त्यांना पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

अकोल्यात आयकॉन रुग्णालयात दाखल

अकोल्यातील आयकॉन  हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले असून उपचार सुरू आहेत, प्रहार कार्यकर्त्यांची मोठया प्रमाणात गर्दी येथे असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालक मंत्री बच्चू  कडू काही वेळात येथे पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी  अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुडे, आ नितीन देशमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, डॉ अमोल रावणकार, गजानन कांबळे, संग्राम गावंडे, पंकज जायले आदींनी धाव घेतली.


टिप्पण्या