आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 27 मार्च पासून


आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 27 मार्च पासून
आ. गोपीकिशन बाजोरिया यांचा पुढाकार
अकोला: कबड्डीचे माहेरघर असलेल्या केळीवेळी येथे 27, 28 व 29 मार्च 2020 रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आ. गोपीकिशन बाजोरिया यांच्या पुढाकाराने या वर्षी ही स्पर्धा होत असून त्याला आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा केळीवेळी 2020 असे नामकरण करण्यात आले असल्याची माहिती कबड्डी मंडळाचे संयोजक माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी यांनी दिली आहे. 
27 मार्च पासून सुरु होणाऱ्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी अनेक दिग्गज येणार असून त्यामध्ये पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे, गृहमंत्री ना. अनिल देशमुख, महिला बालकल्याण मंत्री ना. यशोमती ठाकुर, क्रीडा मंत्री ना. सुनिल केदार व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चुभाऊ कडू यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित सीने कलावंत आपली हजेरी लावणार असल्याचे दाळू गुरुजी यांनी सांगितले. 
यंदा केळीवेळी कबड्डीचे 78 वे वर्ष असून 1942 साली स्थापन झालेल्या हनुमान क्रीडा प्रसारक मंडळ व बहुउद्देशीय संस्थेने नुकताच आपला अमृत महोत्सव साजरा केला आहे. यावर्षी राज्यातील विविध भागातून कबड्डीचे खेळाडू केळीवेळीत दाखल होणार आहेत. महिला आणि पुरुष गटात खेळल्या जाणाऱ्या कबड्डीच्या विजेत्या संघाला आकर्षक बक्षिसे आणि चषक ठेवण्यात आले आहे. पुरुष गटात प्रथम विजेत्या संघाला एकाहत्तर हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.  हे बक्षीस सुप्रसिद्ध व्यापारी खरोटे ज्वेलर्स, अकोला यांच्या कडून देण्यात येणार आहे. तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एकाव्वन हजार रुपये व तृतीय क्रमांकाचे बक्षीस एकत्तीस हजार रुपये राहणार आहे तर महिला गटात प्रथम बक्षीस एकाव्वन हजार रुपये प्रा. मधुकर पवार यांच्या कडून देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकाचे एकत्तीस हजार रुपयांचे बक्षीस हुसे ज्वेलर्स, अकोला यांच्या कडून तर तृतीत क्रमांकाचे एकवीस हजार रुपयांचे बक्षीस डॉ. प्रा. मुकुंद खुपसे (पाटील) यांच्याकडून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मॅन ऑफ दी मॅचसह विविध प्रकारचे 50 बक्षीसे ठेवण्यात आली आहेत अशी माहिती दाळू गुरुजी यांनी यावेळी दिली. 
विधान परिषदेचे ज्येष्ठ सदस्य गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावे आ. चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होत असून कबड्डी प्रेमी जणांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. केळीवेळी गावाने क्रीडा क्षेत्रात कबड्डीमुळे आपले नावलौकिक केले असून देश गौरवासाठी देश-विदेशात आपले खेळाडू पाठविले आहेत. पाऊन शतकाची ही परंपरा अशीच कायम असून या गावाला अनेकांनी साथ दिली आहे. या वर्षीचा राज्यस्तरीय कबड्डी महोत्सव लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर, उद्योजक स्व. राधाकिसन व स्व. अंगुरीदेवी बाजोरिया, मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू स्व. पुंडलीकराव अवचार व स्व. संजय हिवरे (गुरुजी), यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात आला आहे. दि. 27 मार्च 2020 रोजी सायंकाळी केळीवेळीच्या मैदानावर भव्य उद्‌घाटन सोहळा होणार असून 29 मार्च पर्यंत ही स्पर्धा रोज सायंकाळी 5 ते 10 या वेळेत खेळल्या जाणार आहे. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आ. गोपीकिशन बाजोरिया व माजी आमदार गजानन दाळू गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रा. तुकाराम बिरकड, माजी आ. डॉ. जगन्नाथ ढोणे, मंडळाचे अध्यक्ष गजानन मोंढे, ‌माजी जि.प. सदस्य ज्ञानदेवराव परनाटे, माधवराव बकाल व मंडळाचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पण्या