शारीरिक शिक्षण शिक्षक दिन विशेष

शारीरिक शिक्षण शिक्षक दिन विशेष

शारीरिक शिक्षण वाऱ्यावर

24 जानेवारी हा शारीरिक शिक्षण दिन म्हणून साजरा होतो. आरोग्याचा मंत्र शिक्षणातून रुजवून , राष्ट्राची शान वाढविणाऱ्या विविध खेळांचा सराव घेऊन महाराष्ट्राला अव्वल स्थानी बसविण्याचे काम महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण शिक्षकांनी केले. मात्र शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण शिक्षकाचे पदच नवीन स्तररचनेत राहिले नसल्याने 'शारीरिक शिक्षण वाऱ्यावर' असे  शारीरिक शिक्षण शिक्षक दिनी धाडसाने म्हणता येईल.

        आघाडी सरकारच्या कालखंडात महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम स्वतंत्र स्वतंत्र "क्रीडा धोरण 2012" तयार करून त्याची अंमलबजावणी 2014 पासून केली. क्रीडा धोरणात मूलभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, क्रीडा स्पर्धा व क्रीडांगण अनुदान, प्रोत्साहन अनुदान, शिष्यवृत्ती योजना, शालेय वेळापत्रकात क्रीडासाठीच्या तासिका उपलब्धतेबाबत यशपल समितीची शिफारस तसेच वृद्ध खेळाडूंसाठी सानुग्रह अनुदान मंजूर केले. प्रत्येक तीन वर्षानंतर त्यामध्ये 25 टक्के वाढ सूचवून एक आदर्श निर्माण केला. क्रीडा चळवळीची फक्त ऑलिंपिक खेळाशीच तुलना न करता, प्रत्येक खेळाला आरक्षणाच्या तराजूतच न मापता "खेळाचे मैदान हे सुदृढ स्वास्थ्यासाठी  शासनाने उपलब्ध करून दिलेले खुले व्यासपीठ" म्हणावयास हरकत नाही . त्याची परिणीती टीव्ही मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवत लाखो विद्यार्थी खेळाच्या मैदानावर स्वतःच्या आवडीचा खेळ खेळण्यासाठी अवतरली म्हणजे मैदाने "क्रीडा तीर्थक्षेत्रात" रूपांतरित झाली.


      हसत खेळत सुदृढ आरोग्याचा कानमंत्र जणूकाही शासनाने दिला आणि तो प्रत्यक्षात अवतरला असताना मागील शासनामध्ये मंत्रालयात असलेल्या  एका अधिकाऱ्याने शालेय स्पर्धेतील 43 खेळांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने क्रीडा चळवळीला लगाम लागल्याने वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या खेळाडूंनी मैदानापासून दूर राहणेच  पसंत केले.

     एकीकडे मैदानापासून लाखो खेळाडू दूर ढकलले जात असताना, आहे त्या खेळात खेळाडू वर्षानुवर्ष टिकवून ठेवून प्राविण्य संपादन करण्यासाठी मैदानावरील शारीरिक शिक्षण शिक्षकाला स्वतःला झोकून देऊन मेहनत करावी लागत होती.  शाळे वेळेव्यतिरिक्त  स्वतःसाठी नव्हे तर खेळाडू व महाराष्ट्राला भारतात नंबर वन बनवून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. शारीरिक शिक्षण शिक्षकाने  शालेय राष्ट्रीय स्पर्धा, पुणे व गुवाहटी येथील खेलो इंडिया युथ गेम सारख्या स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळवून देऊन शारीरिक शिक्षण शिक्षकाच्या अतिरिक्त कामावर पदकांची मोहर उमटवून सिद्ध केले, महाराष्ट्राला खेळात नंबर वन बनविले.

      महाराष्ट्र खेळात अव्वलस्थानी विराजमान झाला. मात्र शालेय शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण शिक्षक स्वतःच स्थान मात्र कायमचे गमावून बसला. सन 2014-15 पासून संचमान्यतेतून शारीरिक शिक्षण शिक्षकांचा दर्जा काढून घेऊन सर्वसामान्य पदवीधर शिक्षकाच्या पंक्तीत त्यास नेऊन  बसवला. माध्यमिक मधून उच्च प्राथमिकला वर्गीकृत केले.एवढे काही घडले असताना  2017 झाली कुठल्याही अभ्यासगटाची तक्रार अथवा या विषयाच्या तासिका कमी करण्याची शिफारस नसताना कला- क्रीडा विषयाच्या तासिका निम्म्याने कमी करून शारीरिक शिक्षणावरच घाव घातला गेला. आंदोलने, मोर्चे, लाखोंचा उठाव याची दखल घेत शासनाने तासिका पूर्ववत केल्या. पुढे कला क्रीडा विषयाला भविष्यात व्यवस्थेतूनच बाद करण्यासाठी "सेवा शर्ती अधिनियम सुधारणेच्या" नावाखाली या सुधारणा अन्वये नव्याने शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली. यामध्ये शारीरिक शिक्षण विषयासाठी फक्त 9-12 साठीच शैक्षणिक अर्हता निर्धारित करून शिक्षक भरतीसाठी मात्र पूर्ण वेळाची अट घातली गेली. तर पहिली ते आठवी शारीरिक शिक्षण वाऱ्यावर सोडून विषय शिकविण्यासाठी कुठली शैक्षणिक अर्हता हवी हे कुठेही उल्लेखित न केल्याने भविष्यात शारीरिक शिक्षण व कला शिक्षण मोडीत निघणार आहे. पूर्वी माध्यमिकसाठी शारीरिक शिक्षण शिक्षक भरती बायफोकल पद्धतीने  होत होती, ती थांबवून शारीरिक शिक्षणाच्या पूर्ण कार्यभाराची अट नवीन भरतीसाठी घालण्यात आल्याने  शारीरिक शिक्षणाचे कंबरडे या निर्णयामुळे मोडणार आहे. शारीरिक शिक्षण विषयाला प्रचलित अभ्यासक्रमात 8% भारांश असताना सेवाशर्ती नियमातील बदल व पूर्ण कार्यभाराची अट यामुळे महाराष्ट्रात शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या अवघ्या 1%  जागाही भरल्या जाणार नाहीत हे आत्ताच झालेल्या भरतीत दिसून आले . शिक्षकच राहिला नाही तर शारीरिक शिक्षण कसे गळी उतरणार. त्यामुळे या घडीला तरी सर्व शारीरिक शिक्षण शिक्षक वाऱ्यावर  दिसते आहे.

राजेंद्र कोतकर
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ.

टिप्पण्या