akot-court-verdict-murder-case : सुनेला न्याय! पतीच्या निर्घृण हत्येप्रकरणी सासऱ्याला जन्मठेप; अकोट सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सुनेच्या डोळ्यांसमोरच वडिलांनी केली होती मुलाची हत्या; आरोपीला ५० हजारांचा दंड, दंडाची रक्कम सुनेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे न्यायालयाचे आदेश



नीलिमा शिंगणे जगड 

अकोला | भारतीय अलंकार न्यूज 24


दारूच्या नशेत घरगुती वादातून स्वतःच्या मुलाची धारदार चाकूने वार करून हत्या करणाऱ्या आरोपी वडिलांना अकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बाळकृष्ण जानराव ठाकरे (वय ६७, रा. रामटेकपुरा, नवदुर्ग नगर, अकोट) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.


आरोपीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. विशेष म्हणजे, आरोपीने दंडाची रक्कम भरल्यास ती फिर्यादी सुनेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.


नेमकी घटना काय होती?


या प्रकरणातील फिर्यादी ही मृतक धनंजय ठाकरे यांची पत्नी असून आरोपी बाळकृष्ण ठाकरे हे तिचे सासरे आहेत. आरोपीला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नी मथुरा आणि मुलगा धनंजय यांच्यासोबत वाद घालत असे. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत असे.


दि. ११ जानेवारी २०२४ रोजी रात्री ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास आरोपी दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याचा पत्नी मथुरा यांच्यासोबत वाद झाला. या वादादरम्यान आरोपीने पत्नीला शिवीगाळ करून आज रात्री तुला कापून टाकतो, अशी धमकी दिली.


हा प्रकार ऐकून मुलगा धनंजय याने वडिलांना आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी का देता, असा जाब विचारला. याचाच राग मनात धरून आरोपी बाळकृष्ण ठाकरे याने खिशातील धारदार लहान चाकू काढून मुलगा धनंजय याच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात धनंजयचा मृत्यू झाला. ही घटना फिर्यादी सुनेच्या डोळ्यांसमोर घडली.


१० साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वपूर्ण


या घटनेनंतर अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक २८/२०२४ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश जावरे आणि तत्कालीन ठाणेदार पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी केला. त्यानंतर अकोट विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी पुढील तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.


न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मृतकाची पत्नी अर्थात फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.


सरकारी वकिलांचा कठोर शिक्षेसाठी युक्तिवाद


सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. आरोपीने स्वतःच्या तरुण मुलाची, म्हणजेच फिर्यादीच्या पतीची, तिच्या डोळ्यांसमोर हत्या केली. फिर्यादीवर वैधव्याचे दुःख कोसळले असून तिच्या लहान मुलांच्या भविष्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोपीला कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.


दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी बाळकृष्ण जानराव ठाकरे याला जन्मठेपेची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम फिर्यादी सुनेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे निर्देश देत न्यायालयाने पीडितेच्या न्यायाच्या अपेक्षेलाही महत्त्व दिले.


पोलीस प्रशासनाचे सहकार्य


या प्रकरणात पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडक, अकोट पोलीस उपविभागीय अधिकारी निखील पाटील आणि अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जोशी आणि पोलीस कॉन्स्टेबल आश्विन नवघरे यांनी सहकार्य केले.


अकोट सत्र न्यायालयाच्या या निकालामुळे स्वतःच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा झाली असून, पीडित सुनेला नुकसानभरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेशही या निकालातील महत्त्वाचा भाग ठरला आहे.

टिप्पण्या