akola-court-cyber-crime-case: अकोला न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; बेकायदेशीर अटकेवर बोट ठेवत पोलीस कोठडीची मागणी फेटाळली, ॲड.शिवम शर्मा यांचा प्रभावी युक्तिवाद




ठळक मुद्दे 

*आदेशाची प्रत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे पाठवली

*पुण्यातून ताब्यात घेतलेल्या आरोपीला २४ तासांत व नजीकच्या न्यायालयात हजर न केल्याचा युक्तिवाद ठरला निर्णायक

*ॲड. शिवम शर्मा यांच्या धारदार युक्तिवादापुढे सायबर पोलिसांची ५ दिवसांची पीसीआर मागणी नामंजूर



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: १५ लाख ५३ हजार रुपयांच्या बहुचर्चित ऑनलाईन सायबर फसवणूक प्रकरणात पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच्या अटकेच्या कायदेशीर वैधतेवर बोट ठेवत बचाव पक्षाचे वकील ॲड. शिवम शर्मा यांनी केलेला अभ्यासपूर्ण व धारदार युक्तिवाद अकोला न्यायालयात निर्णायक ठरला आहे. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर नजीकच्या न्यायालयात हजर न करणे आणि अटकेपासून २४ तासांच्या आत न्यायालयात सादर न करणे हे कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे दाखले देत ॲड. शर्मा यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून अकोल्याच्या सह प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूनम जमाईवार यांनी सायबर पोलिसांची ५ दिवसांच्या पोलीस कोठडीची (PCR) मागणी फेटाळून लावली. विशेष म्हणजे, तपासातील या प्रक्रियात्मक त्रुटीची गंभीर दखल घेत या आदेशाची प्रत  मुख्य न्यायदंडाधिकारी (Chief Judicial Magistrate), अकोला यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे.


काय आहे नेमके प्रकरण?

अकोल्यातील कौलखेड परिसरातील रहिवासी फिर्यादी गजानन नारायणराव नेमाडे (वय ४९) यांना फेसबुकवर 'तनवी शर्मा' नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्यानंतर व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून 'Bear Stearns GOLD Capital' या कंपनीमार्फत गोल्ड मायनिंग आणि ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून फिर्यादीकडून वेळोवेळी विविध बँक खात्यांत एकूण १५,५३,०८१ रुपये उकळण्यात आले. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन, अकोला येथे गुन्हा क्रमांक ०३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान फिर्यादीच्या फसवणूक झालेल्या रकमेपैकी ६,०१,५०२ रुपये पुण्यातील सदाशिव पेठ येथील रहिवासी चेतन दिलीप पवार (वय २७) याच्या ‘सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक’ मधील खात्यात वर्ग झाल्याचे समोर आले. त्यानुसार सायबर पोलिसांच्या तपास पथकाने पुणे येथे जाऊन डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आरोपी चेतन पवार याला ताब्यात घेतले आणि अकोला येथे आणून दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २:४४ वाजता अटक दर्शवून दि. २४ नोव्हेंबरपर्यंत (५ दिवसांची) पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.



ॲड. शिवम शर्मा यांचा धारदार युक्तिवाद आणि उच्च न्यायालयाचे दाखले


काल (दि. २० नोव्हेंबर) आरोपीला सह प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पूनम जमाईवार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीच्या वतीने ॲड. शिवम शर्मा यांनी पोलिसांच्या कोठडी मागणीला तीव्र व कायदेशीर विरोध केला. ॲड. शर्मा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार तेथील नजीकच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर (ट्रान्झिट रिमांडसाठी) हजर करणे बंधनकारक होते; मात्र पोलिसांनी तसे केले नाही. इतकेच नव्हे तर प्रत्यक्षात ताब्यात घेतल्यापासून २४ तासांच्या आत आरोपीला न्यायालयात हजर न करता नंतरची अटक वेळ दाखवण्यात आली, जे घटनात्मक तरतुदींचे आणि फौजदारी कायद्याचे थेट उल्लंघन आहे.

यावेळी ॲड. शिवम शर्मा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) महत्त्वपूर्ण न्यायनिवाड्यांचा संदर्भ देत ठामपणे युक्तिवाद केला की, "जर आरोपीला अटकेनंतर २४ तासांच्या आत किंवा नजीकच्या न्यायालयासमोर हजर केले गेले नाही, तर अशी अटक पूर्णपणे बेकायदेशीर (Illegal) ठरते आणि संबंधित आरोपी तात्काळ सुटकेस (Released Forthwith) पात्र ठरतो."


न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश आणि मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दखल

बचाव पक्षाचे वकील ॲड. शिवम शर्मा यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे, पोलिसांच्या कार्यवाहीतील गंभीर त्रुटी आणि मुंबई उच्च न्यायालयाचे बंधनकारक दाखले विचारात घेऊन न्यायदंडाधिकारी पूनम जमाईवार यांनी सायबर पोलिसांची ५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. यासोबतच, या आदेशाची प्रत पुढील माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी  मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) यांच्याकडे पाठवण्यात आल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तपासाच्या नावाखाली नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि कायदेशीर प्रक्रियेवर गदा आणता येणार नाही, हा संदेश या निकालामुळे अधोरेखित झाला असून अकोला विधिज्ञ वर्तुळात ॲड. शिवम शर्मा यांच्या या अभ्यासपूर्ण व प्रभावी युक्तिवादाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या