court-verdict-crime-news-akl: विनयभंग प्रकरणात आरोपीला सक्त मजुरीची शिक्षा

अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीवर एकूण ६,५०० रुपयांचा दंड, त्यातील ५ हजार रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : बालिकेच्या विनयभंग प्रकरणात अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीला विविध कायद्यांतील कलमांनुसार दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१, अकोला प्रदीप नाईकवाड यांनी शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला. आरोपी नजीर खा पठाण निजाम खा पठाण (वय ३५, रा. बहुजन नगर, शिवणी, अकोला) याला पोक्सो कायद्यांतर्गत ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच भारतीय दंड विधान आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


प्राप्त माहितीनुसार, ही घटना १३ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली होती. त्यावेळी पीडिता आपल्या घरासमोरील अंगण झाडत असताना आरोपी तेथे आला आणि त्याने तिचा विनयभंग केला.


या घटनेनंतर पीडितेने दिलेल्या कथनाच्या आधारे तिच्या आईने १४ डिसेंबर २०१८ रोजी अकोल्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३५४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ७ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


तपासादरम्यान प्रकरणात पोक्सो कायद्याची कलमे ९(म), १० तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ मधील कलम ३(१)(w)(i) आणि ३(२)(va) या कलमांची वाढ करण्यात आली.


दोन अधिकाऱ्यांनी केला तपास


या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक वीणा  भालतिलक (भगत) यांनी केला. त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची वाढीव कलमे लागू झाल्याने पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश  माने यांनी पूर्ण केला. तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.


सहा साक्षीदारांच्या साक्षी ठरल्या महत्त्वपूर्ण


न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, पीडिता तसेच अन्य साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने ग्राह्य धरल्या. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षी विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.


न्यायालयाने सुनावली विविध कलमांनुसार शिक्षा


जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ प्रदीप  नाईकवाड यांनी आरोपी नजीर खा पठाण याला पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली.


- भारतीय दंड विधान कलम ३५४ : तीन वर्षे सक्तमजुरी व १,५०० रुपये दंड. दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी.

- पोक्सो कायदा कलम ८ व १० : पाच वर्षे सक्तमजुरी व २,५०० रुपये दंड. दंड न भरल्यास पाच महिने सक्तमजुरी.

- अ‍ॅट्रॉसिटी कायदा कलम ३(१)(w)(i) : एक वर्ष साधी कैद व १,००० रुपये दंड. दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद.

- अ‍ॅट्रॉसिटी कायदा कलम ३(२)(va) : तीन वर्षे सक्तमजुरी व १,५०० रुपये दंड. दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी.


न्यायालयाने वरील सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोपीने यापूर्वी कारागृहात घालवलेला कालावधी शिक्षेतून वजा करण्यात येणार आहे.


पीडितेला ५ हजार रुपये नुकसानभरपाई


न्यायालयाने आरोपीला ठोठावलेल्या एकूण ६,५०० रुपयांच्या दंडाच्या रकमेतून ५,००० रुपये पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.


सरकारी पक्षाची बाजू अतिरिक्त सरकारी वकिलांनी मांडली


या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच पैरवी अधिकारी एएसआय फझलुर रेहमान काजी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोर्ट पैरवी महिला हवालदार अनुराधा महल्ले यांनी सहकार्य केले.



टिप्पण्या