anticipatory-bail-legal-news-: यज्ञ हॉस्पिटल हल्ला व तोडफोड प्रकरणात आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर! ॲड. राकेश पाली व ॲड. कल्याणी तायडे यांचा प्रभावी युक्तिवाद

जिल्हा व सत्र न्यायालय-२ चा महत्त्वपूर्ण निर्णय; ॲड. राकेश पाली व ॲड. कल्याणी तायडे यांचा प्रभावी युक्तिवाद




नीलिमा शिंगणे जगड 

अकोला | भारतीय अलंकार न्यूज 24


अकोल्यातील यज्ञ हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ला व तोडफोड प्रकरणात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालय-२ यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. राकेश पाली व ॲड. कल्याणी तायडे यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तसेच विविध अटी व शर्तींच्या अधीन राहून अटकपूर्व जामीन मंजूर केला.


नेमके प्रकरण काय?


मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या दरम्यान रणपिसे नगर येथील बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील यज्ञ हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. मृतक रोशनी यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या योगेश मोरे (अर्जदार आरोपी) व त्यांचे नातेवाईक आणि साथीदार यांनी रुग्णालयात प्रवेश करून तोडफोड केली तसेच डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.


या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक ६४१/२०२६ नोंदविण्यात आला. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२४(४), ११५(२), ३३३, ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


सहा आरोपींना अटक; मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडून जामीन


या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली होती. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी, अकोला यांच्या न्यायालयातून त्यांना जामीन मंजूर झाला. दरम्यान, मृतक रोशनी यांचे पती असलेल्या अर्जदाराने जिल्हा व सत्र न्यायालय-२, अकोला येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.


बचाव पक्षाचा CCTV फुटेजवर भर


अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने ॲड. राकेश पाली व ॲड. कल्याणी तायडे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. आरोपी हा कथित घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित नव्हता. तसेच उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्येही आरोपी कुठेही दिसून येत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.


याशिवाय, प्रकरणातील आरोपांचे स्वरूप पाहता आरोपीकडून कोणतीही जप्ती करणे आवश्यक नाही, तसेच याच प्रकरणातील इतर आरोपींना न्यायालयाने यापूर्वीच नियमित जामीन मंजूर केला आहे, या बाबीही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.


न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरला


बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे व युक्तिवाद विचारात घेऊन जिल्हा व सत्र न्यायालय-२ यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. आरोपीला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून तूर्तास दिलासा देण्यात आला.


या प्रकरणात ॲड. आनंद साबळे, ॲड. खुशी पाली व श्रावणी टेकाडे यांनी बचाव पक्षाला सहकार्य केले.


दरम्यान, अटकपूर्व जामीन मंजूर होणे म्हणजे आरोपीची निर्दोष मुक्तता नव्हे. प्रकरणाचा पुढील तपास व न्यायालयीन प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू राहणार आहे.




BhartiyaAlankarNews24 BAnews24 



टिप्पण्या