भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या उपाययोजनांवर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी सडकून टीका केली. जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन आणि वीजबिलातील सवलतींच्या नावाखाली शेतकऱ्यांची थट्टा सुरू असल्याचा आरोप करत, शेतकरी संकटात असताना सरसकट ५० हजार रुपये हेक्टरी मदत तातडीने जाहीर करण्याची मागणी त्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.
आमदार देशमुख म्हणाले, शासनाने जाहीर केलेले पीककर्ज पुनर्गठन मोघम असून, यापूर्वीच्या पुनर्गठनामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीस तसेच प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरले नाहीत. त्यामुळे केवळ कर्जवसुलीस स्थगिती देण्याऐवजी सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली. जमीन महसुलातील सूट आणि कृषी पंपाच्या वीजबिलातील सवलतीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. जमीन महसूल आधीच अत्यल्प असून, कृषी पंपाच्या वीजबिलात यापूर्वीच सवलत आहे. त्यामुळे या उपाययोजना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष संकटावर तोडगा कसा काढणार, असा सवाल त्यांनी केला. सोलर प्रकल्पांसाठी शेतजमिनी अवघ्या एक रुपये दराने वाटल्या जात असतील, तर शेतकऱ्यांना मोफत आणि २४ तास वीज का दिली जात नाही, असा सवाल आमदार नितीन देशमुख यांनी केला. महायुती सरकारने दिवसा वीज देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात दिवसा वीजपुरवठा खंडित का होतो, याचा जाब सरकारने द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार,
जिल्हासंघटिका डॉ. सरिता वाकोडे, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनिकर, ज्ञानेश्वर म्हैसने, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), शहर प्रमुख राहुल कराळे(अकोला पूर्व), महिला शहर संघटिका वर्षा पिसोडे आदी उपस्थित होते.
मजुरांना देयके मिळण्यास विलंब
रोजगार हमी योजनेतील कामगारांची देयके वेळेत मिळत नाहीत. दुष्काळाच्या मुद्द्यावर शासन गंभीर नसल्यामुळेच परिपत्रकात अशा थातूरमातूर उपाययोजना करण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी मदत केंद्र
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी २८ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मदत केंद्र सुरू करणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी महत्त्वाच्या
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चामुळे महायुती सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अकोला शहरात २२ सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढताच २३ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळापुर तालुक्यात दाखल झाले. त्यांनी महामार्गालगतच्या शेतीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर दिल्याचा टोला आमदार देशमुख यांनी लगावला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा