shetkari-aakrosh-morcha-bul: कोरड्या दुष्काळाने शेतकरी संकटात; महायुती सरकार सत्तेच्या मस्तीत मश्गूल : नितीन देशमुख

५१ दिवसांपासून पाऊस गायब; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

बुलढाणा : विदर्भात तब्बल ५१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नांकडे महायुती सरकार दुर्लक्ष करत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी केला.


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच माजी केंद्रीय मंत्री, पक्षाचे नेते, प्रवक्ते तथा खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहरातील ओंकार लॉन येथे शेतकरी आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार नितीन देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.


येत्या २९ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


“शेतकरी होरपळतोय, पिके जळतायत; सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे सोयरसुतक नाही”


आमदार नितीन देशमुख म्हणाले की, पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असताना सरकार मात्र सत्तेच्या मस्तीत मश्गूल असल्याचा आरोप त्यांनी केला.


“शेतकरी होरपळतोय, पिके जळतायत; पण महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे कवडीचेही सोयरसुतक नाही,” अशा शब्दांत देशमुख यांनी सरकारवर निशाणा साधला.


हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी


दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत, तसेच संभाव्य चाराटंचाई आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली.


शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


सरकारला जागे करण्यासाठी आक्रोश मोर्चा


शेतकऱ्यांच्या संकटाकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारला आता शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकविल्याशिवाय पर्याय नाही, असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले.


“कुंभकर्णी झोपेत गेलेल्या महायुती सरकारला जागे करण्यासाठी बुलढाण्यातील शेतकरी आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन त्यांनी पदाधिकारी, शिवसैनिक आणि शेतकऱ्यांना केले.


शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे हे शिवसेनेचे कर्तव्य असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.


बैठकीला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती


या नियोजन बैठकीला मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके, प्रा. दत्तात्रय लहाने, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कर्हाडे, जिल्हासंघटक अॅड. सुमित सरदार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


२९ सप्टेंबरचा शेतकरी आक्रोश मोर्चा हा सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले.


ठळक मुद्दे


विदर्भात ५१ दिवसांपासून पावसाने दडी


खरीप पिके करपण्याच्या मार्गावर


दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी


पाणीटंचाई व चाराटंचाईसाठी कृती आराखड्याची मागणी


२९ सप्टेंबरला बुलढाण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा


हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

टिप्पण्या