aakash-fundkar-diwali-2026: पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केली शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी महिलाभगिनींचा साडी, फराळ देऊन सन्मान




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला, दि. ८ : राज्याचे कामगार मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी लक्ष्मीपूजनाच्या आजच्या दिवशी तेल्हारा तालुक्यातील गोर्धा या गावी जाऊन तेथील शेतकऱ्यांसमवेत दिवाळी साजरी केली व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना दिलासा दिला. यावेळी दिवाळी, पाडवा व भाऊबीजनिमित्त गावातील शेतकरी, शेतमजूर महिलाभगिनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते फराळ व साडी देऊन सन्मानही करण्यात आला. आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह अनेक मान्यवर, महिलाभगिनी व नागरिक उपस्थित होते.


राज्यात दुष्काळाचे संकट उद्भवले आहे. मात्र या काळात शेतकरी बांधवांनी डगमगून जाऊ नये. राज्य शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. दुष्काळ लक्षात घेऊन शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पाहता तत्काळ अग्रीम मदत जाहीर केली व वेगाने वाटप होत आहे. यानंतर दुष्काळबाधितांसाठी सर्व ती आवश्यक मदत टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. राज्य शासन शेतकरी बांधवाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.


दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैनगंगा–नळगंगा नदीजोड प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विपुल साठवण क्षमता असलेल्या पूर्व विदर्भातील गोसी खुर्द प्रकल्पाचे पाणी अकोला, बुलडाणा जिल्ह्यापर्यंत पोहोचून सर्व विदर्भातील कोरडवाहू प्रदेश कायमचा दुष्काळमुक्त होईल. शेतकरी, महिला भगिनी अशा सर्व घटकांसाठी शासनाकडून सर्वांसाठी घरे– विविध आवास योजना, लाडकी बहिण योजना, उज्ज्वला योजना अशा अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.



यावेळी पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी शेतकरी गजानन परनाटे यांच्या घरी जाऊन संवाद साधला व त्यांचे कुटुंबीय व शेतकऱ्यांसोबत फराळ केला.  गावातील श्री हनुमान मंदिर येथे सभागृहात त्यांनी शेतकरी बांधव, महिला भगिनींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना दिलासा दिला. उपस्थित महिला भगिनींना फराळ व साडी देऊन सन्मान करण्यात आला. दिवाळीच्या दिवशी स्वतः पालकमंत्र्यांनी येऊन आमच्यासोबत दिवाळी साजरी केली. प्रत्येक सुखदुःखात शासन शेतकऱ्यांसोबत आहे ही समाधानाची बाब असल्याची भावना उपस्थित शेतकरी बांधवांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पण्या