swift-action-grp-akola-police: जीआरपी अकोला पोलिसांची धडक कारवाई: ९ वर्षांपासून फरार आरोपी शेगावमधून जेरबंद, तर ३ तासांत मोबाईल चोरणारा हिस्ट्रीशीटर पोलिसांच्या जाळ्यात!
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: रेल्वे पोलीस स्टेशन, अकोला येथे सन २०१७ पासून न्यायालयात समन्स आणि वॉरंट निघूनही सतत गैरहजर राहणाऱ्या एका सराईत आरोपीला अटक करण्यात जीआरपी (GRP) अकोला पोलिसांना यश आले आहे. आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
रोहित अशोक लोखंडे (वय ३४ वर्षे, रा. शेगाव, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अकोला रेल्वे पोलीस ठाण्यात कलम ३९२, ३४ भादंवि तसेच कलम ३७९ भादंवि अन्वये जबरदस्तीने चोरी आणि चोरीचे गंभीर गुन्हे प्रलंबित आहेत. सदर प्रकरणात आरोपी मागील नऊ वर्षांपासून न्यायालयात गैरहजर राहून फरार झाला होता, ज्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते.
जीआरपी अकोला पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर आरोपी शेगाव परिसरात फिरत आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपीचा ठावठिकाणा निश्चित केला व २५ ऑगस्ट रोजी त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अंमलदार गौतम, कपिल आणि चालक कुणाल यांनी केली. त्यानंतर एएसआय असलम खान पठाण आणि पोलीस हवालदार राजेश पाटील यांनी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीविरुद्ध न्यायालयीन कोठडीचे वॉरंट काढून त्याची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
रेल्वे स्टेशनवरून मोबाईल लांबवणारा हिस्ट्रीशीटर ३ तासांत निष्पन्न; २४ तासांत फिर्यादीला मोबाईल परत
अकोला रेल्वे स्टेशन परिसरातून एका कामगाराचा मोबाईल लांबवणाऱ्या रेकॉर्डवरील 'हिस्ट्रीशीटर' गुन्हेगाराला जीआरपी अकोला पोलिसांनी अवघ्या ३ तासांत CCTV फुटेजच्या आधारे शोधून काढले. पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेला ₹१४,०००/- किमतीचा मोबाईल जप्त करून तो २४ तासांच्या आत मूळ मालकाला परत केला.
तालुका वसमत (जि. हिंगोली) येथील पारंपरिक हातमाग कामगार महेश इकलवार (वय २५ वर्षे) हा शेगाव येथे दर्शन घेऊन आपल्या गावी जाण्यासाठी अकोला रेल्वे स्टेशनवर आला होता. रात्रीची ट्रेन असल्याने तो स्टेशन परिसराबाहेर चहा पिण्यासाठी जात असताना बुकिंग ऑफिससमोरील ऑटो स्टँडजवळ त्याचा ₹१४,०००/- किमतीचा OPPO कंपनीचा मोबाईल चोरीला गेला. याप्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथे अपराध क्र. २७९/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल दोंड यांनी डीबी (DB) पथकाला तपासाचे निर्देश दिले. डीबी पथकाचे पोलीस हवालदार सतीश जवंजाळ, पोलीस अंमलदार गवई, गौतम व इरफान यांनी परिसरातील सुमारे ३ तासांचे CCTV फुटेज बारकाईने तपासले. यात संशयास्पद हालचाली करणारा रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटर बाबूशहा शौकत शहा (वय ३५ वर्षे, रा. पूरपीडित कॉलनी, अकोट फाईल, अकोला) हा निदर्शनास आला. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.
आरोपीच्या गुन्हेगारी रेकॉर्डची तपासणी केली असता, त्याच्यावर आयपीसी (IPC) व बीएनएस (BNS) अंतर्गत ६ विविध गुन्हे दाखल असून त्याने ६ महिन्यांचा कारावासही भोगला आहे. पोलिसांनी आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.
तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल २४ तासांच्या आत मूळ मालक महेश इकलवार यास सुपूर्द केला. कष्टाने घेतलेला मोबाईल तात्काळ परत मिळाल्याने इकलवार यांनी अकोला रेल्वे पोलिसांचे आभार मानले.
'हिस्ट्रीशीटर' म्हणजे काय?
वारंवार गुन्हे करणाऱ्या किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलीस विभागाकडून नियमानुसार निगराणी ठेवली जाते. अशा व्यक्ती सध्या कुठे राहतात, काय काम करतात, त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन काय आहे तसेच त्यांचे वर्तन कसे आहे, याबाबतची माहिती नियमितपणे संकलित केली जाते. नमूद हिस्ट्रीशीटर मागील काही दिवसांपासून वस्तीत राहून थोडेफार कामधंदा करत होता. त्याच्या वर्तनात सुधारणा होत असतानाच त्याने पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळून गुन्हा केल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.
"हिस्ट्रीशीटर व निगराणीखालील व्यक्तींमध्ये सुधारणा व्हावी, हीच पोलीस विभागाची अपेक्षा असते. जे गुन्हेगार सुधारण्याची इच्छाशक्ती दाखवतात, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाते. मात्र, अंगवळणी पडलेल्या चुकीच्या सवयींमुळे काही व्यक्ती उदरनिर्वाहाचे अधिकृत साधन निवडण्याऐवजी पुन्हा गैरमार्गाचा अवलंब करून गुन्हेगारीकडे वळतात," असे लोहमार्ग अकोला रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल दोंड यांनी स्पष्ट केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा