khamboara-murder-case-akola: खांबोर्यात २७ वर्षीय शैलेष तेलगोटेचीे हत्या; प्रकरणाला नवे वळण, तीन मुख्य आरोपी तीन तासांत अटकेत
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम खांबोरा येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या २७ वर्षीय शैलेष श्रीकृष्ण तेलगोटे याच्या मृत्यूच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. शैलेष याची हत्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून संगनमत करून करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला असून, मुख्य तीन आरोपींना घटना घडल्यापासून अवघ्या तीन तासांच्या आत अटक करण्यात आली आहे.
अकोला जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात वासुदेव रामभाऊ भरणे (वय ६०), चेतन वासुदेव भरणे (वय ३२) आणि सचिन सांगरधर भरणे (वय ३७), सर्व रा. खांबोरा यांना आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत शैलेष श्रीकृष्ण तेलगोटे (वय २७, रा. पाळोदी, ता. अकोला) याचे खांबोरा येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून मुलीचे नातेवाईक वासुदेव रामभाऊ भरणे व इतरांनी संगनमत करून शैलेष याच्यावर हल्ला केला, अशी फिर्याद मृताचा भाऊ निलेश श्रीकृष्ण तेलगोटे यांनी उरळ पोलीस ठाण्यात दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपींनी शैलेषच्या डोक्यात, हातावर आणि शरीरावर लोखंडी रॉड व टोकदार वस्तूने गंभीर मारहाण केली. या हल्ल्यात शैलेषचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न?
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब अधिकृत सूत्रांकडून नमूद करण्यात आली आहे. गुन्ह्याची फिर्याद पोलिसांकडे दाखल होण्यापूर्वी संबंधित आरोपींनी खांबोरा गावात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका व्यक्तीला लोकांनी मारहाण करून पकडले, असा बनाव करून गावातील लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मात्र, या कथित प्रकाराबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध झाला नसल्याचे तपासात समोर आले.
परिस्थितीजन्य पुरावे अन् तांत्रिक तपासातून आरोपी निष्पन्न
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. परिस्थितीजन्य पुरावे, जनसंपर्क, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती, मृताच्या अंगावरील जखमांचे निरीक्षण तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.
या तपासातून वरील तिन्ही आरोपींची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन तासांत तीनही आरोपी अटकेत
पोलिसांच्या अधिकृत माहितीनुसार, घटना घडल्यानंतर तिन्ही आरोपी गावातून फरार झाले होते. पोलिसांनी तात्काळ त्यांच्या शोधासाठी परिसरात शोधमोहीम राबवली आणि घटना घडल्यापासून अवघ्या तीन तासांच्या आत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध अटक कारवाई सुरू आहे.
या कारवाईमुळे उरळ पोलिसांच्या तपासाच्या वेगाचेही विशेष कौतुक होत आहे.
मृताच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर आरोप
दरम्यान, यापूर्वी मृत शैलेषचे कुटुंबीय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले होते. पोलिसांनी केवळ काही आरोपींची नावे घेतली असून, इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.
जोपर्यंत इतर आरोपींची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांकडून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, आता अकोला जिल्हा पोलीस सूत्रांनी मुख्य तीन आरोपींची नावे स्पष्ट केली असून, तिन्ही आरोपींना तीन तासांच्या आत ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
कोणाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई?
ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
उरळ पोलीस ठाण्याचे स.पो.नि. जनार्दन खंडेराव, पो.उपनि. परमेश्वर केंद्रे, पोलीस हवालदार विजय चव्हाण, रघुनाथ नेमाडे, श्रीकृष्ण सोंळके, अनंत सुरवाडे, पोलीस अंमलदार विकास राठोड, पोलीस शिपाई चालक नागरे, वाकोडे तसेच उरळ पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली.
पुढील तपास सुरू
खांबोरा येथील या घटनेमुळे पालोदीसह परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिन्ही मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असून, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम, हल्ल्यात वापरण्यात आलेली हत्यारे आणि इतर व्यक्तींची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.
ठळक मुद्दे
- खांबोरा येथे २७ वर्षीय शैलेष तेलगोटे यांचा मृत्यू
- प्रेमसंबंधाच्या कारणावरून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा
- लोखंडी रॉड व टोकदार वस्तूने हल्ला केल्याचे सूत्रांची माहिती
- तीन मुख्य आरोपींची नावे पोलिसांकडून जाहीर
- घटनेपासून अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपी अटकेत
- चोरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा दावा
- परिस्थितीजन्य व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी निष्पन्न
- मृताच्या कुटुंबीयांनी यापूर्वी पोलिसांवर इतर आरोपींना वाचवण्याचा आरोप केला होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा