india-day-parade-in-new-york: सातासमुद्रापार छत्रपती शिवरायांचा जयघोष; न्यूयॉर्कमध्ये भव्य इंडिया डे परेडमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जागर
भारतीय अलंकार न्यूज 24
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया डे परेडमध्ये यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती दिमाखात सादर करण्यात आली. छत्रपती फाउंडेशन, न्यूयॉर्कच्या वतीने साकारण्यात आलेल्या भव्य ‘कीर्तीरथा’ने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हजारो भारतीय आणि अमेरिकन नागरिकांच्या उपस्थितीत मॅडिसन अव्हेन्यू परिसर भगवामय झाला आणि सातासमुद्रापार छत्रपती शिवरायांचा जयघोष घुमला.
फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सच्या वतीने दरवर्षी इंडिया डे परेडचे आयोजन करण्यात येते. यंदा झालेल्या या परेडमध्ये छत्रपती फाउंडेशनच्या कीर्तीरथावर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बाल शिवबा आणि मावळ्यांच्या भूमिका साकारण्यात आल्या. बालक, महिला आणि युवकांनी आकर्षक वेशभूषा आणि प्रभावी अभिनयातून शिवकालीन इतिहास जिवंत केला. तब्बल १०० हून अधिक सदस्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि लोककलेचे भव्य प्रदर्शन अमेरिकेच्या भूमीवर सादर केले.
कीर्तीरथासोबत जल्लोष ढोल-ताशा पथकाच्या ५० हून अधिक वादकांनी न्यूयॉर्क शहर दणाणून सोडले. तसेच जगप्रसिद्ध रुद्रा डान्स ग्रुपच्या कलाकारांनी विविध लोकनृत्ये सादर केली. लिव्हिंग्स्टनच्या राजा ग्रुपच्या युवतींनी लेझीम नृत्य सादर करत रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांची मने जिंकली. पारंपरिक पोशाख, ढोल-ताशा, लेझीम आणि ऐतिहासिक देखावे यामुळे परेडला मराठमोळा रंग चढला.
या परेडला न्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी होचल यांना ग्रँड मार्शलचा मान देण्यात आला. न्यूयॉर्कच्या विकासात भारतीय समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडे तसेच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेची संपूर्ण टीमही परेडमध्ये उपस्थित होती.
मिशिगन राज्याचे अमेरिकन काँग्रेसमन श्री ठाणेदार यांनी कीर्तीरथावर विशेष अतिथी म्हणून पूर्णवेळ उपस्थित राहत जनसमुदायाला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम रणनीतीकार होते. त्यांची न्यायप्रिय वृत्ती, नेतृत्वगुण आणि उद्योजकता आजही प्रेरणादायी आहे. शिवरायांच्या चरित्रातून आजच्या युवकांनी अनेक धडे घ्यावेत, असे आवाहन करत त्यांनी छत्रपती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
न्यू हॅम्पशायर राज्याचे स्टेट रिप्रेझेन्टेटिव्ह संतोष साळवी यांचीही विशेष उपस्थिती होती. भारताचे न्यूयॉर्कमधील उपराजदूत विशाल हर्ष आणि वाणिज्य दूत राजलक्ष्मी कदम यांनी छत्रपती फाउंडेशनसोबतचे सहकार्य भविष्यात आणखी वाढवण्याची आशा व्यक्त केली.
विशेष म्हणजे यंदाच्या परेडमध्ये भारतीयांसोबतच अमेरिकन आणि विविध देशांतील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. ढोल-ताशा, पारंपरिक पोशाख, नृत्य आणि शिवकालीन इतिहासाचे सादरीकरण पाहून स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
परेडसोबतच छत्रपती फाउंडेशनच्या वतीने उद्योग आणि करिअर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हॉस्पिटॅलिटी आणि आयटी क्षेत्रातील सुमारे २० कंपन्यांचे संस्थापक, सीईओ आणि सीटीओ यांच्यासोबत काँग्रेसमन श्री ठाणेदार आणि रिप्रेझेन्टेटिव्ह संतोष साळवी यांनी संवाद साधला. महाराष्ट्रातून सुरुवात करून अमेरिकेत उद्योग उभारण्याचा आपला प्रवास त्यांनी सांगितला. मराठी युवकांना उद्योग क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
व्हिसा धोरणातील बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आयटी क्षेत्रात होत असलेल्या बदलांबाबतही चर्चेत चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषतः शैक्षणिक कर्ज घेऊन अमेरिकेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील रोजगाराच्या प्रश्नावर आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.गेल्या १५ वर्षांपासून छत्रपती फाउंडेशन, न्यूयॉर्कच्या माध्यमातून शिवजयंती, जिजाऊजयंती, अहिल्यादेवी जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. यंदाच्या इंडिया डे परेडमधील भव्य कीर्तीरथामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग (MTDC) तसेच मराठी भाषा मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचेही या उपक्रमाला सहकार्य लाभले. कीर्तीरथाच्या भव्य आयोजनासाठी अमेरिकेतील १० राज्यांतून आलेल्या छत्रपती फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
न्यूयॉर्कच्या मॅडिसन अव्हेन्यूवर भगवा फडकला, ढोल-ताशांचा निनाद झाला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी सातासमुद्रापार महाराष्ट्राचा इतिहास आणि स्वाभिमान पुन्हा एकदा जगासमोर आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा