political-news-shivsena-ubt-akl : दिवाळी अंधारात; भाजपने दाखवला ८२ हजार शेतकऱ्यांना ठेंगा- आमदार नितीन देशमुख
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, त्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, अशा मोठमोठ्या गप्पा हाकणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा समोर आला असून अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये अग्रीम रक्कम मिळाली नसल्याचे उद्धवसेनेचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर विदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकरी आंदोलन सुरू करण्याचा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.
कोरड्या दुष्काळामुळे विदर्भातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये अग्रीम रक्कम देऊन त्यांची दिवाळी गोड करणार, असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. अकोला जिल्ह्यातील तीन लाख सहा हजार पात्र शेतकऱ्यांपैकी अद्यापही ८२ हजार शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळाली नाही. यामुद्यावर उद्धवसेनेचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. पाच हजार रुपयात भाजपच्या स्थानिक खासदार, आमदारांची दिवाळी साजरी झाली का? असा सवाल उपस्थित करीत शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याच्या प्रकारामुळे राज्य सरकार व त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधींचे शेतकऱ्यांप्रती धोरण व हेतू प्रामाणिक नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांसाठी मतदारसंघ निहाय आंदोलन
राज्य सरकारने विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट १ लाख रुपयांची आर्थिक मदत न केल्यास हिवाळी अधिवेशनानंतर विदर्भात विधानसभा मतदारसंघ निहाय शेतकरी आंदोलन सुरू करण्याचा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला. मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चार महिन्यात ६४ शेतकरी!
कोरड्या दुष्काळाच्या दाहकतेमुळे मागील चार महिन्यात जिल्ह्यातील ६४ शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपविल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. राज्यात मागील नऊ महिन्यात २२२ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. हा आकडा पाहता राज्य सरकारचे धोरण सपशेल कुचकामी व अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.
मंत्र्यांची आश्वासने हवेत; स्थानिकांच्या तोंडाला कुलूप
२० सप्टेंबर रोजी अकोल्यात आलेले कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, २३ सप्टेंबर रोजी बाळापूर तालुक्यात शेताची पाहणी करण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ३० सप्टेंबर रोजी अकोल्यात आलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याचे असल्याचे आश्वासन हवेत विरली आहेत. या मुद्द्यावर भाजपच्या स्थानिक खासदार, आमदारांनी साधलेल्या चूप्पीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करणार
भाजपच्या काही लोकप्रतिनिधींसाठी महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करून कोट्यवधी रुपयांच्या योजनांमध्ये खुलेआम भ्रष्टाचार केला जात आहे. लवकरच मनपातील अशी अनेक प्रकरणे उघडकीस आणण्याचा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला.
पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार, उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, सुरेंद्र विसपुते, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, जिल्हासंघटक भूषण भिरड, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), शहरप्रमुख राहुल कराळे (अकोला पूर्व), युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अभय खुमकर, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने, संजय भांबेरे, किरण अवताडे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा