congress-minority-department: आ. साजिद खान पठाण यांच्याकडे काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची धुरा; महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; जिल्ह्याच्या राजकीय वजनात वाढ

संघर्षातून घडलेल्या नेतृत्वावर पक्षश्रेष्ठींची मोहोर, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे अकोला जिल्ह्याच्या राजकीय महत्त्वात भर पडली असून, जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या साजिद खान पठाण यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्क, संघर्ष आणि संघटन कौशल्याच्या बळावर स्वतःचे स्वतंत्र नेतृत्व निर्माण केले. अकोला महानगरपालिकेचे नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांच्या कामामुळे ते काँग्रेसमधील अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाऊ लागले.


सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना अकोला पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात त्यांनी अत्यंत अटीतटीची लढत दिली; मात्र अल्प फरकाने त्यांचा पराभव झाला. पराभवानंतरही त्यांनी मतदारसंघातील जनसंपर्क कायम ठेवला. त्यांच्या कामाची दखल घेत काँग्रेसने २०२४ मध्ये पुन्हा उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला.


आमदार झाल्यानंतर त्यांनी अकोल्यातील राजराजेश्वर मंदिराच्या विकासासाठी निधीची मागणी, उर्दू घर उभारणीचा पाठपुरावा, तसेच शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न विधानसभेत सातत्याने मांडले. त्यांच्या सक्रिय आणि अभ्यासपूर्ण भूमिकेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर राज्यस्तरीय जबाबदारी सोपविली आहे.


काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय महासचिव तथा खासदार मुकुल वासनिक आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी साजिद खान पठाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.


या नियुक्तीमुळे राज्यभरातील अल्पसंख्याक विभागाच्या संघटनात्मक कामाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्याच्या राजकारणात अधिक प्रभावीपणे होणार असल्याची भावना काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी व्यक्त केली आहे.

टिप्पण्या