bapusaheb-deshmukh-pass-away: संत गाडगेबाबांच्या निष्काम कर्मयोगाचा वारसा चालविणारे सेवाव्रती बापूसाहेब देशमुख यांचे निधन

photo: bhartiya alankar news 24




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबांच्या सेवा, त्याग आणि निष्काम कर्मयोगाचा वसा व वारसा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणारे, श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे उपाध्यक्ष तथा श्री गाडगे महाराज ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त, संत गाडगे बाबांच्या संकल्पनेतील नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार, सेवाव्रती बापूसाहेब देशमुख यांचे निधन झाले.


बापूसाहेबांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे सेवा, त्याग, समर्पण आणि मानवतेचा अखंड ध्यास होते. संत गाडगेबाबांनी दाखवून दिलेल्या सेवामार्गाला त्यांनी केवळ स्वीकारले नाही, तर तो आपल्या जीवनाचा श्वास बनवला. गरजू, वंचित, दुःखी आणि निराधारांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.


नागरवाडीच्या पवित्र भूमीत त्यांनी उभारलेले कार्य हे केवळ एक वास्तू नाही, तर त्यांच्या त्यागाची, दूरदृष्टीची आणि सेवाभावाची जिवंत स्मृती आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संत गाडगेबाबांच्या विचारांशी आणि सेवाकार्याशी निष्ठावंत राहिलेले हे महान सेवाव्रती आज आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या जाण्याने गाडगेबाबांच्या सेवाकार्याची एक दीपज्योत जणू हरपली आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांचे कार्य, त्यांचे संस्कार, त्यांची सेवावृत्ती आणि मानवतेसाठी त्यांनी केलेला त्याग हा पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.



अंत्यविधी कार्यक्रम

स्व. बापूसाहेब देशमुख यांची पवित्र अंतिम यात्रा आज सायंकाळी श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था, मूर्तिजापूर येथून निघणार आहे.

त्यांच्या पवित्र पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या आप्तेष्टांनी दिली.








टिप्पण्या