ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला अकोल्यात व्यापारी, खासगी शाळा-महाविद्यालये आणि विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा; प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
ठळक मुद्दे
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद.
अकोला जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठा दिवसभर बंद.
काही खासगी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुटी जाहीर केली.
व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला.
शिवसेना (ठाकरे गट)सह विविध सामाजिक संघटना बंदमध्ये सहभागी.
नीट पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी.
नीलिमा शिंगणे जगड
अकोला | दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनानंतर अकोला शहरात सकाळपासूनच पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शहरातील प्रमुख मार्गांवर फेरी काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. "हा बंद तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आहे," असे सांगत कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.
या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. परिणामी शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकोल्यातील काही खासगी शाळा आणि महाविद्यालयांनीही एक दिवसासाठी सुटी जाहीर केली. याबाबत पालकांना पूर्वसूचना देण्यात आली होती. मात्र, अनुदानित व इतर अनेक शाळांमध्ये नियमितपणे अध्यापन सुरू असल्याचे दिसून आले.
वंचित बहुजन आघाडीने बंद यशस्वी करण्यासाठी सकाळपासून विविध भागांत जनजागृती मोहीम राबवली. व्यापाऱ्यांना, नागरिकांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना बंदचे महत्त्व समजावून सांगत शांततेत आंदोलन करण्यात आले.
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधासह नीट पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.
या महाराष्ट्र बंदला अकोला जिल्ह्यात शिवसेना (ठाकरे गट)सह विविध सामाजिक आणि कामगार संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला. युवा समिती, महाराष्ट्र शेतकरी संघटना, कुणबी समाज मंडळ, जिल्हा बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशन, छावा, कुंभार समाज विकास परिषद, संभाजी ब्रिगेड, डाटा आदी संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला.
शांततेत पार पडलेल्या या बंदमुळे अकोला शहरातील व्यापारी व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधाचा आवाज विदर्भातूनही उमटल्याचे चित्र दिसून आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा