spurious-soybean-seeds-akola: बोगस सोयाबीन बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर जिल्हाबंदी करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या- आमदार नितीन देशमुख




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर, पातूरसह विविध भागांतील शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. कृषी विभागाच्या तपासणीत संबंधित बियाण्यांचे नमुने निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर जिल्ह्यात विक्रीबंदी घालावी आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी ठाम मागणी शिवसेना उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे केली.


या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभागाचे अधिकारी, बीज उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, बीज विक्रेते असोसिएशनचे पदाधिकारी, शेतकरी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्यानंतर संबंधित बियाण्यांचे नमुने तपासण्यात आले. तपासणीत काही कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यावेळी आमदार देशमुख यांनी ज्या कंपन्यांच्या बियाण्यांमुळे पेरणी फसली, त्या कंपन्यांच्या बियाण्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, त्यांच्याकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी तसेच संबंधित कंपन्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी केली. या संदर्भात योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना केले. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, योगेश्वर वानखडे, ज्ञानेश्वर म्हैसने, शहरप्रमुख राहुल कराळे, संजय भांबेरे, गोपाल विखे, किशोर राऊत, वासुदेव वक्ते, निलेश हाडोळे यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक मुरलीधर इंगळे, जिल्हा परिषद कृषी अधिकारी राठोड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.



बियाणे विक्री न करण्याचा निर्णय


कृषी विभागाच्या तपासणीत रवी सिड्स, बुस्टर सिड्स, ओसवाल सिड्स, इनोव्हिज सिड्स आणि विगोअर सिड्स या कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांबाबत गंभीर त्रुटी आढळल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्यानुसार या कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या बियाण्यांच्या विक्रीवर अकोला जिल्ह्यात रब्बी व खरीप हंगामासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कृषी सेवा केंद्र संचालक असोसिएशनचे अध्यक्ष मोहन सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी या कंपन्यांची बियाणे विक्री न करण्याचा निर्णय जाहीर केला.

टिप्पण्या