ठळक मुद्दे
इंडियन मेडिकल असोसिएशनला ५ लाख रुपयांची देणगी सुपूर्द
अकोला, अमरावती, वाशिम आणि लातूरमधील ११० हून अधिक डॉक्टरांचा सहभाग
असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग मायक्रोबायोलॉजिस्ट्स अँड पॅथॉलॉजिस्ट्स, अकोलाच्यावतीने आयोजन
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग मायक्रोबायोलॉजिस्ट्स अँड पॅथॉलॉजिस्ट्स, अकोलाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण (CME - Continuos Medical Education) या विशेष शैक्षणिक परिषदेचे अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात आले. या परिषदेत पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी आणि ट्रान्सफ्युजन मेडिसिन क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि दैनंदिन आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि संघटनेच्या अध्यक्षा डॉ. निर्मला रांदड यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. संघटनेच्या अध्यक्षा डॉ. निर्मला रांदड व सचिव डॉ. तपस्या भारती- गोसावी यांच्या नेतृत्वाखाली तसेच डॉ. मयुरी महाजन यांच्या उत्कृष्ट समन्वयाने हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी असोसिएशनच्या सदस्यांच्या विशेष प्राविण्य प्राप्त पाल्यांचे, जीत झामड, पलाश पाचकोर आणि नम्रता पाटील यांचे अध्यक्षा डॉ. निर्मला रांदड आणि प्रमुख अतिथी डॉ. रुजुता आयाचित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन कौतुक करण्यात आले. या परिषदेत विविध शहरांतून आलेल्या नामवंत तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अकोल्यातील प्रख्यात वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. दीपाली शुक्ला यांनी ‘पॅथॉलॉजिकल दृष्टिकोनातून हार्मोेन्सचे क्लिनिकल महत्त्व’ यावर प्रकाश टाकला. अकोल्याचे ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. प्रद्योत गर्गे यांनी प्रयोगशाळेतील 'D-Dimer' चाचणीचे विश्लेषण व व्यावहारिक अडचणींवर सविस्तर व्याख्यान दिले. लातूर येथील सर्जिकल पॅथॉलॉजिस्ट डॉ. रुजुता आयाचित यांनी रोगांच्या निदानामध्ये हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासण्यांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. छत्रपती संभाजीनगर येथील एम.जी.एम. मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सचिन काळे यांनी पॅथॉलॉजीमधील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हिमॅटॉलॉजीतील आव्हानांवर प्रभावी मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. महेंद्रसिंह चौहान यांनी रक्तपेढीच्या दैनंदिन कामकाजातील समस्या व उपायांवर संवाद साधला. या परिषदेत अकोल्यासह वाशीमचे डॉ. डाळे, अमरावतीचे डॉ. इंगोले आणि डॉ. गहुकार यांच्यासह सुमारे ११० हून अधिक डॉक्टर्स, प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट्स आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अकोल्यातील पॅथॉलॉजीस्ट डॉ. आहेर, डॉ. बागडी, डॉ. उजवणे, डॉ. घाटे, डॉ. पिंपरकर, डॉ. मीनाक्षी मोरे, डॉ. मोरे आणि डॉ. झुनझुनवाला यांच्यासह अकोल्यातील सर्वच पॅथॉलॉजीस्ट्स आणि मायक्रोबायोलॉजिस्ट्स यांंची यावेळी विशेष उपस्थिती होती. स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ही परिषद एक उत्तम 'शैक्षणिक मेजवानी' ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रचना अग्रवाल व डॉ. वैशाली राऊत यांनी ओघवत्या शैलीत केले. शेवटी सचिव डॉ. तपस्या भारती-गोसावी यांनी सर्व वक्ते, प्रतिनिधी, प्रायोजक आणि सहकार्यांंचे आभार मानले.
‘आयएमए’ला ५ लाखांची देणगी
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 'APMPA' च्यावतीने 'इंडियन मेडिकल असोसिएशन' बिल्डिंग फंडासाठी ५ लाखांची सामाजिक देणगी प्रदान करण्यात आली. अध्यक्षा डॉ. निर्मला रांदड यांच्या नेतृत्वाखाली हा धनादेश डॉ. अनुप कोठारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्राच्या विकासासाठी संघटनेने जपलेली ही बांधिलकी सर्वांंच्या कौतुकास पात्र ठरली.
शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविणार- डॉ. निर्मला रांदड
भविष्यातही वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी यासाठी असे शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबविणार असल्याची ग्वाही अध्यक्षा डॉ. निर्मला रांदड यांनी दिली. या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण वैद्यकीय वर्तुळातून डॉ. रांदड व त्यांच्या टीमचे अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा