farm-loan-waiver-farmer-relief: राज्यातील ६३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मोठा दिलासा! आमदार सावरकर यांच्या नेतृत्वाखालील मागणीला यश!!
ठळक मुद्दा
२०१९ च्या योजनेतील १३ लाख शेतकऱ्यांनाही दोन लाखांपर्यंत लाभ
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला | नीलिमा शिंगणे जगड
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, २०१९ च्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांनाही ५० हजार रुपयांच्या मर्यादेऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना आमदार रणधीर सावरकर यांनी ही घोषणा शेतकऱ्यांच्या हितासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. महायुती सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे या निर्णयातून सिद्ध केल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील वंचित शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची मागणी केली होती. तसेच शासन निर्णयातील काही अटींमध्ये बदल करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली होती.
पावसाळी अधिवेशन २०२६ दरम्यान २३ जून रोजी नियम २९३ अंतर्गत झालेल्या चर्चेतही आमदार सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित केला होता. राज्यातील दुष्काळ, अवर्षण, अतिवृष्टी, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सभागृहात मांडून शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली होती.
शिष्टमंडळाने शासनाकडे दिलेल्या निवेदनात २०२१-२२ आणि २०२२-२३ मधील अवर्षण, २०२५-२६ मधील अतिवृष्टी तसेच २०२६-२७ मध्ये उशिरा झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाल्याचे नमूद केले होते. त्यामुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत लाभ द्यावा, तसेच काही अटी शिथिल करून अधिकाधिक शेतकऱ्यांचा समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली होती.
मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत शेतकरीहिताचा निर्णय जाहीर केल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने सकारात्मक भूमिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.
ठळक मुद्दे
राज्यातील सुमारे ६३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
२०१९ च्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील १३ लाख शेतकऱ्यांनाही दोन लाखांपर्यंत लाभ
आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील मागणीला यश
नियम २९३ अंतर्गत सभागृहात शेतकऱ्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडला
अवर्षण, अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीचा विचार करून निर्णय
महायुती सरकारने शेतकरीहिताचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा दावा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा