court-update-legal-news-akola: सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व पत्नीला शिवीगाळ व मारहाण प्रकरण: कारागृहात असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीतील सराईत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला





भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला |नीलिमा शिंगणे जगड 

मागासवर्गीय सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व त्यांच्या पत्नीला जातीयवाचक शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच घराची जाळपोळ केल्याच्या गंभीर प्रकरणात अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने कारागृहात बंदिस्त असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीतील दादा इंदुरीकर, गौरव इंदुरीकर, गौरव जामूनकर या  आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्याचा आदेश दिला.


या प्रकरणातील तिन्ही सराईत आरोपींचा फौजदारी जामीन अर्ज क्र. 596/2026 फेटाळला आहे. फिर्यादीतर्फे ॲड. नजीब शेख यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत जामीन अर्ज नामंजूर केला.



ॲड नजीब शेख यांचा अभ्यासपूर्ण युक्तिवाद

फिर्यादीच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या लेखी म्हणण्यानुसार, आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना जामीन मंजूर झाल्यास साक्षीदारांवर दबाव आणणे, पुराव्यांशी छेडछाड करणे तसेच पुन्हा गंभीर गुन्हे करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद ॲड. नजीब शेख यांनी केला.


अशी आहे घटना 

फिर्यादी या अकोला येथील राजरत्न कॉलनी, मलकापूर परिसरातील रहिवासी असून त्यांचे पती पोलीस विभागातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. आरोपी हे संघटित गुन्हेगारी टोळीचे सक्रिय सदस्य असून दहशत निर्माण करून अवैध वसुली करत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ३ जुलै २०२६ रोजी डॉक्टर कॉलनी येथील नव्या घराला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या व त्यांचे पती घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची व गोळी घालण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळही  करण्यात आली आहे.

याशिवाय घरात घुसून फर्निचर, इन्व्हर्टर, सुटकेस व इतर साहित्याची जाळपोळ व तोडफोड करून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान  करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. फिर्यादीने न्यायालयात असेही नमूद केले की, मुलाच्या उपचारासाठी आरोपीच्या पत्नींकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. त्यातील काही रक्कम ऑनलाइन व उर्वरित रक्कम रोख स्वरूपात परत करण्यात आली होती. मात्र, अधिक पैशांची मागणी करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्य आरोपीविरुद्ध हत्या, अपहरण, मारहाण, धमकी, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच घटनेनंतरही फिर्यादी व त्यांच्या पतीला धमकावण्यात आल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्याचे लेखी म्हणण्यात नमूद करण्यात आले.

 

यशस्वी तपास 

या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटिल यांच्या यशस्वी तपासामुळे फिर्यादी यांना मोठा दिलासा मिळाला.


जामीन अर्ज फेटाळला 

फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्याचा आदेश दिला. 


यांचे सहकार्य

या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने ऍड. नजीब शेख व त्यांचे सहकारी ऍड. शिबा मलिक, ऍड. सोहराबुद्दीन जागीरदार यांनी सहाय्य केले. तर शासनाची बाजू  सरकारी वकील ऍड. किरण खोत यांनी प्रभावीपणे मांडली.

टिप्पण्या