congress-protest-delhi-neet-: काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यासह सर्वांची सुटका; लढा सुरूच राहणार, सरकारला विद्यार्थ्याच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार




विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या लढ्याला पोलिसी लगाम?; 'धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावाच' – आमदार साजिद खान पठाण



नीट (NEET) परीक्षा कथित पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील विद्यार्थ्यांच्या संतापाला उधाण आले असताना राजधानी दिल्लीत सोमवारी 'शिक्षण बचाव' आंदोलनाने जोर धरला. संसदेकडे कूच करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी कारवाई करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले. या घटनेनंतर केंद्र सरकारवर विरोधकांनी लोकशाही दडपल्याचा गंभीर आरोप करत देशभरात संतापाची लाट उसळली आहे.


पोलिसांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रामकिशन ओझा, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, रघुनाथ मीणा, सुरेश कुमार, महादेव ओझा, बबलू अजीज, रिजवान खान तसेच एनएसयूआय आणि काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. आमदार साजिद खान पठाण यांना दिल्ली-हरियाणा सीमेवरील कापसशेडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


काँग्रेसचा आरोप आहे की, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शांततेत निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अडवून आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. "लोकशाहीत आवाज उठवणाऱ्यांना ताब्यात घेणे म्हणजे संविधानाच्या मूल्यांवरच आघात आहे," असा आरोपही करण्यात आला.


अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला. "नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे करिअर अंधारात गेले आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढत आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील," असे त्यांनी स्पष्ट केले.


आंदोलनकर्त्यांनी सरकारकडे काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये आंदोलनकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, तसेच नीट प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करावी, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.


देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नावर केंद्र सरकारची भूमिका काय असणार, हा आता मोठा प्रश्न बनला आहे. एकीकडे विद्यार्थी न्यायाची मागणी करीत आहेत, तर दुसरीकडे आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईमुळे लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरला आहे. दिल्लीतील या कारवाईमुळे नीट पेपरफुटीचा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.



दरम्यान, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या देणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या समवेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना सायंकाळी पोलिसांनी जबरदस्तीने हटवले. त्यांना ताब्यात घेऊन इतरत्र हलवण्यात आले.

राहुल गांधी यांना छत्रसाल स्टेडियमला, तर प्रियंका यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. प्रियंका यांच्या भेटीसाठी त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी पोलीस ठाण्यात पोहचल्या. काही तासांनंतर पोलिसांनी सर्व नेत्यांची सुटका केली. 

त्याआधी ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला. त्यांनी जमिनीवर लोळण घेतली. त्यामुळे पोलिसांना त्यांना जोर लावून उचलावे लागले. त्या गोंधळात राहुल यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.


𝐖𝐞 𝐬𝐭𝐚𝐧𝐝 𝐰𝐢𝐭𝐡 𝐬𝐭𝐮𝐝𝐞𝐧𝐭𝐬, 𝐚𝐧𝐝 𝐰𝐞 𝐰𝐢𝐥𝐥 𝐟𝐢𝐠𝐡𝐭 𝐮𝐧𝐭𝐢𝐥 𝐞𝐯𝐞𝐫𝐲 𝐬𝐭𝐮𝐝𝐞𝐧𝐭 𝐠𝐞𝐭𝐬 𝐣𝐮𝐬𝐭𝐢𝐜𝐞.- Rahul Gandhi 

दरम्यान हे आंदोलन सुरूच राहणार असून, भारतातील विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या आणि त्यांनी सोसलेल्या अन्यायाबद्दल न्याय मिळवून देण्याच्या लढ्यात कोणतीही किंमत क्षुल्लक आहे. विद्यार्थांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारला द्यावीच लागणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

टिप्पण्या