bogus-soybean-seeds-fraud-: बोगस सोयाबीन बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करा- आमदार रणधीर सावरकर
ठळक मुद्दा
शेतकऱ्यांना एकरी 48 हजार रुपये नुकसान भरपाई द्या - आमदार रणधीर सावरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जिल्ह्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाणे वितरीत झाल्यामुळे अकोला, मुर्तीजापूर आणि बार्शीटाकळी या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर पेरणी उलटल्यामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या यंत्रणा, बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांसोबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीला मुर्तीजापूरचे आमदार हरीश पिंपळे उपस्थित होते.
बैठकीत शेतकऱ्यांची फसवणूक करून लूट करणाऱ्या बोगस सोयाबीन बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशा संतप्त सूचना आमदार पिंपळे यांनी केल्या.
सदर बैठकीमध्ये कृषी विभागाचा बेजबाबदार आणि गलथान कारभार निदर्शनास आल्याने अशा दोषी आणि असंवेदनशील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आमदार रणधीर सावरकर यांनी दिलेले प्रमुख निर्देश
1. जिल्ह्यात विक्री करण्यात आलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची वेळेत तपासणी न करणे तसेच साथी पोर्टलवर नोंदणी नसताना बियाणे विक्री झाल्याप्रकरणी कृषी अधिकारी आणि बियाणे विक्री करणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करण्यात यावी.
2. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर अजामीनपात्र आर्थिक फसवणुकीचे गुन्हे तातडीने नोंदविण्यात यावेत. गुन्ह्यांचे स्वरूप संदिग्ध आणि त्रोटक असून कंपन्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार झाल्याची शंका आहे. त्यामुळे फिर्यादीतील स्वरूप बदलावे.
3. सदर प्रकरण EOW कडे चौकशीसाठी वर्ग करावे.
4. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले आहे अशा शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांकडून प्रति एकरी 48 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
5. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे.
6. जिल्ह्यात आलेले बोगस बियाणे, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, कंपन्यांवर करावयाची कारवाई आणि शेतकऱ्यांना द्यावयाचा मोबदला या सर्व बाबींचा अहवाल कृषी खात्याने तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा.
7. भविष्यात असा प्रकार होणार नाही याची दक्षता विक्रेते तसेच अधिकाऱ्यांनी घ्यावी. अकोला जिल्ह्याचे नाव बदनाम होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.
8. कृषी विक्रेते हे शेतकऱ्यांचे विश्वासू असतात. त्यामुळे बियाणे विकताना त्याची शहानिशा करण्याची जबाबदारी दुकानदारांनी लक्षात घ्यावी.
आमदार सावरकर म्हणाले, "जिल्ह्यामध्ये बोगस बियाणे विक्री करणाऱ्या संस्थांवर संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडून खूप उशिरा गुन्हे नोंदविण्यात आले. शेतकऱ्यांचा उद्रेक आणि लोकप्रतिनिधींची मागणी झाल्यानंतर जाग येणे हे कर्तव्यापासून मागे हटणे आहे. कंपन्यांना वाचवण्याचा प्रयत्न करू नये. आपण शेतकऱ्यांचे पुत्र आहोत याचे भान अधिकाऱ्यांनी ठेवावे. शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. त्याच्यावर अन्याय आम्ही सहन करणार नाही."
या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचेही आमदार सावरकर यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा