sant-gajanan-maharaj-palakhi: ”जय गजानन श्री गजानन ” च्या गजरात संत गजानन महाराजांची पालखी अकोल्यात दाखल; भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत




ठळक मुद्दा
५७ व्या पायी वारीत ७०० हून अधिक वारकऱ्यांचा सहभाग | महापौर शारदा खेडकर यांच्या हस्ते स्वागत | आज अकोला शहरात पालखी मुक्कामी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला | श्री संत गजानन महाराजांची  पालखी आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करून आज मंगळवार २३ जून २०२६ रोजी अकोला शहरात दाखल झाली आहे. यंदा श्रींच्या पायी पालखी वारीचे ५७ वे वर्ष असून ७०० हून अधिक वारकरी, रथ, अश्व, मेणा, वैद्यकीय चमू आणि आवश्यक सुविधांसह भव्य ताफा पालखीसोबत सहभागी झाला आहे. सध्या पालखी अकोला शहरात मुक्कामी असून पुढील दोन दिवस शहरात भक्तिमय वातावरण राहणार आहे.

रविवार २१ जून रोजी सकाळी ७.३० वाजता शेगाव येथून श्रींची पालखी मोठ्या भक्तिभावाने मार्गस्थ झाली. पालखी प्रस्थानापूर्वी मंदिरात श्रींचा रजत मुखवटा पालखी मेण्यात विराजमान करून श्री संस्थानच्या सेवाधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

"जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल", "जय गजानन श्री गजानन", तसेच "गण गण गणात बोते" या मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. अभंग, टाळ-मृदंगाच्या निनादात पालखी संतनगरीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली.

प्रवासादरम्यान शेगावहून निघालेली पालखी प्रथम श्री क्षेत्र नागझरी येथे पोहोचली. तेथे श्री संत गोमाजी महाराज संस्थानात महाप्रसादानंतर पुढील प्रवास सुरू झाला. त्यानंतर पारस येथे रात्री मुक्काम झाला. पुढे गायगाव आणि भौरद मार्गे आज पहाटे पालखी अकोला शहरात डाबकी रोड रेल्वे गेट परिसरात दाखल झाली.


अकोला शहरात आगमन होताच महापौर तथा शहराच्या प्रथम नागरिक  शारदा खेडकर यांनी श्रींच्या पालखीचे भक्तिभावाने स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महानगरपालिकेच्या वतीने पालखी मार्गावरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, वाहतूक नियंत्रण आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.


महापौर शारदा खेडकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपमहापौर अमोल गोगे तसेच विविध पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी मनपा मुख्य कार्यालयासमोर श्रींच्या पालखीचे स्वागत केले. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्री ढगे महाराज यांनी महापौरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.


डाबकी रोड परिसरात पालखीचे विविध ठिकाणी भाविकांनी स्वागत केले. यानंतर सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास पालखी खंडेलवाल विद्यालयात पोहचली. याठिकाणी पालखीने विसावा घेतला. यावेळी जुने शहर डाबकी रोड परिसरातील गजानन भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने घेतला. परिसराला यात्रेचे रूप आले होते. या ठिकाणी भाविकांना अकोला शहर पालखी स्वागत समितीच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच पालखीत सहभागी वारकरी यांना भोजन देण्यात आले. 


पालखीत सहभागी सर्वांचा आयोजन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गोपाल खंडेलवाल, डॉ. तारा हातवळणे, नाना कुलकर्णी, मधुर खंडेलवाल, विजय रांदड, रसिका वाजगे, पंडित इंगळे, श्री चाळसे, शशी चोपडे आदी मान्यवर पदाधिकारी व सेवेकरी उपस्थित होते.

विश्रांती नंतर पुढे पालखी मार्गस्थ होवून शहर परिक्रमा करुन मुंगीलाल बाजोरिया विद्यालय येथे मुक्काम केला. उद्या देखील पालखी हरिहर पेठ शिवाजी टाऊन विद्यालय अकोला येथे मुक्कामी राहणार आहे. 


ठळक मुद्दे :


● संत गजानन महाराजांच्या पालखीचे यंदा ५७ वे वर्ष
● ७०० हून अधिक वारकरी पालखीसोबत सहभागी
● रथ, अश्व, मेणा आणि ९ वाहनांचा ताफा
● आज पालखी अकोला शहरात मुक्कामी
● महापौर शारदा खेडकर यांच्या हस्ते स्वागत
● महानगरपालिकेकडून विशेष सुविधा उपलब्ध
● २३ जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे पोहोचणार
● ७५० किमी आणि तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास


 

टिप्पण्या