rescue-operation-bhikund-river: भिकुंड नदीत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; मानव सेवा फाऊंडेशनची धाडसी शोध मोहीम, पाच तासात मृतदेह सापडला

कोळासा गावातील शेतकरी देवराम घोंगे यांचा दुर्दैवी मृत्यू; पाच तासांच्या अथक शोधानंतर मृतदेह हाती


ठळक मुद्दे


- भिकुंड नदीत बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह रात्री १ वाजता शोधून बाहेर काढला

- मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या बचाव पथकाची धाडसी कामगिरी

- २० ते २५ फूट खोल पाण्यात राबविण्यात आले सर्च ऑपरेशन

- प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य

- नागरिकांनी नदीपात्र व पाण्याच्या ठिकाणी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला, दि. ५ जून : बाळापूर तालुक्यातील कोळासा गावाजवळील भिकुंड नदीत बुडालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह शुक्रवारी पहाटे मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर शोधून बाहेर काढला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


माहितीनुसार, कोळासा येथील रहिवासी देवराम तोताराम घोंगे (वय ५५) हे नियमितपणे ट्युबच्या साहाय्याने भिकुंड नदी पार करून नदीच्या पलीकडील शेतात गुरे चारण्यासाठी जात होते. गुरुवारी (४ जून) सायंकाळी गुरे आणण्यासाठी ते नदी पार करण्यासाठी निघाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. दरम्यान, गुरे मात्र घरी परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.


शोध घेण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या नातेवाईकांना नदीच्या पलीकडील काठाजवळ ट्युब, कपडे, चप्पल आणि कुऱ्हाड तरंगताना दिसून आली. त्यामुळे देवराम घोंगे नदीत बुडाल्याचा संशय अधिक बळावला.


घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर, तहसीलदार वैभव फरतारे आणि बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी तातडीने पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण केले.


पथक प्रमुख जीवनरक्षक दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखालील बचाव पथक रात्री १० वाजता रेस्क्यू बोट व अत्याधुनिक शोध साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. नदीपात्राची पाहणी केल्यानंतर तेथे सुमारे २० ते २५ फूट खोल पाणी असल्याचे निदर्शनास आले.


पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये दिपक सदाफळे यांच्यासह प्रतिक बोरसे, मयूर सळेदार, ऋषिकेश राखोंडे, विवेक गाडगे, शाम घोंगे, दिनेश डाबेराव, प्रतिक गाडगे, ओम घोंगे, गौरव गाडगे, वैभव गाडगे, अविनाश कोगदे, आदित्य गाडगे, दिपक घोंगे, प्रतिक घोंगे, रोहित बोरसे, शुभम वानखडे आणि सतीश वानखडे यांनी सहभाग घेतला.


अथक प्रयत्नांनंतर अखेर शुक्रवारी पहाटे १ वाजता देवराम घोंगे यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.


या वेळी पीएसआय विनोद डीगे, हेड कॉन्स्टेबल अविनाश आडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुडके, कोळासा गावचे सरपंच गोपाल कराळे, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष साजन शेगोकार, नातेवाईक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


विशेष म्हणजे, शोधमोहीमेदरम्यान कोळासा गावातील नागरिकांनी रेस्क्यू बोट वाहून नेणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे यासह विविध प्रकारचे मोलाचे सहकार्य केले.


याबाबत माहिती देताना पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी नदी, तलाव आणि पूरग्रस्त भागात नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी पाण्याच्या ठिकाणी सुरक्षिततेचे नियम पाळणे आणि जीव धोक्यात घालणारे प्रकार टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.




टिप्पण्या