railway-land-encroachment-akl: तार फाईल परिसरातील बेघर कुटुंबांना न्याय मिळणार? बाळासाहेब आंबेडकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा



ठळक मुद्दा

150 हून अधिक घरे पाडल्यानंतर प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा; लवकरच घरे देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन


भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला शहरातील तार फाईल परिसरात रेल्वे प्रशासनाने कोणतेही पुनर्वसन न करता सुमारे 150 अतिक्रमित घरांवर बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त केल्याने अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आज अकोला जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन प्रभावित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बाळासाहेब आंबेडकर यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारवाईमुळे उघड्यावर आलेल्या कुटुंबांना तातडीने शासनाच्या घरकुल योजनांचा लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी ठाम भूमिका मांडली. यावेळी तारफैल परिसरातील नागरिकांची व्यथा आणि त्यांच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.

बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी वर्षा मिना यांनी या विषयावर सकारात्मक चर्चा केली असून, पात्र कुटुंबांना लवकरात लवकर घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे

*तार फाईल परिसरातील सुमारे 150 घरे रेल्वे प्रशासनाने पाडली

*पुनर्वसनाशिवाय कारवाई झाल्याने अनेक कुटुंबे बेघर

*बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

*प्रभावित नागरिकांना तातडीने घरकुल देण्याची मागणी

*जिल्हाधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन; पुनर्वसनासाठी लवकर कार्यवाहीचे संकेत

बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महानगर अध्यक्ष मजहर खान, महानगर महासचिव गजानन गवई, नगरसेवक पराग गवई, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक, विकास सदांशिव, महेंद्र डोंगरे, कुणाल राऊत, चंद्रशेखर नकाशे यांच्यासह तार फाईल परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




टिप्पण्या