- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
railway-land-encroachment-akl: तार फाईल परिसरात रेल्वेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू; बाधितांच्या मदतीसाठी VBA आणि काँग्रेस मैदानात!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
१६० घरांवर कारवाईची टांगती तलवार; पुनर्वसनाशिवाय कारवाई केल्याचा आरोप, न्यायालयात जाण्याचा इशारा
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातील तार फाईल परिसरात रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम सोमवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या मालकीच्या जागेवर अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या घरांबाबत रेल्वे प्रशासनाकडून २०१६ पासून नोटिसा बजावण्यात येत होत्या. एकूण सुमारे १६० घरांना जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रशासनाने ३१ मे ही अंतिम मुदत निश्चित केली होती. तसेच नागरिकांनी सकाळी ९ वाजेपर्यंत स्वतःहून अतिक्रमण हटवावे, असे आवाहनही करण्यात आले होते.
मुदत संपल्यानंतर आज सकाळपासून रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली. घटनास्थळी रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल, पोलीस विभाग आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
पुनर्वसनाशिवाय कारवाईचा VBA चा आरोप
या कारवाईला वंचित बहुजन आघाडीने (VBA) तीव्र विरोध दर्शविला आहे. काल जिल्हाधिकारी, रेल्वे प्रशासन आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या चर्चेत बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुनर्वसन करण्याबाबत शासनाचा निर्णय अस्तित्वात असताना त्याची अंमलबजावणी न करता कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप VBA ने केला आहे. या संदर्भात न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी दिली.
काँग्रेसचाही आक्षेप
दरम्यान, काँग्रेस पक्षाने देखील या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. तार फाईल परिसरातील नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून या विषयावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी अकोला पश्चिमचे आमदार साजीद पठाण यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे.
प्रशासन सतर्क, परिसरात कडेकोट बंदोबस्त
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
ठळक मुद्दे
*तार फाईल परिसरातील रेल्वे जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू
*सुमारे १६० घरांना रेल्वेकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या
*३१ मेपर्यंत जागा रिकामी करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती
*VBA चा पुनर्वसनाशिवाय कारवाई केल्याचा आरोप
*न्यायालयात जाणार असल्याचा प्रमोद देंडवे यांचा इशारा
*काँग्रेसनेही नागरिकांवर अन्याय झाल्याचा आरोप केला
*आमदार साजीद पठाण यांची तातडीची पत्रकार परिषद
*घटनास्थळी मोठा पोलीस व रेल्वे सुरक्षा बंदोबस्त
Akola
Akola News
Breaking News
Congress
Encroachment Drive
Maharashtra News
Prakash Ambedkar
Railway Land
Rehabilitation
Sajid Pathan
Tar File
VBA
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा