education-system-congress-: शिक्षण व्यवस्थेच्या अपयशाविरोधात राहुल गांधी यांचा 'कोट्या'तून देशव्यापी एल्गार
ठळक मुद्दा
प्रश्नपत्रिका फुटी, परीक्षा घोटाळे, बेरोजगारी आणि भरतीतील विलंबावर सरकारला धरले धारेवर; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : देशातील शिक्षण व्यवस्था आणि रोजगार प्रक्रियेसमोरील गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनजागृती अभियान सुरू केले असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि युवकांच्या भविष्याशी सुरू असलेला अन्याय जनतेसमोर आणण्यासाठी जिल्ह्यात व्यापक आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई, बबनराव चौधरी, प्रशांत पाचडे, अतुल अमानकर, सुनील वानखेडे, प्रशांत प्रधान, योगेश पाटील, तश्वर पटेल, दीपक गवई, हर्षित दामोदर, नंदकिशोर काळे उपस्थित होते.
देशातील लाखो विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले युवक आज प्रचंड असुरक्षिततेच्या वातावरणात जगत आहेत. प्रश्नपत्रिका फुटी, परीक्षा रद्द होणे, निकालातील गोंधळ, भरती प्रक्रियेतील विलंब, रिक्त पदे न भरणे आणि वाढती बेरोजगारी यामुळे तरुणांच्या भविष्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रकाश तायडे यांनी केला. केंद्र सरकारच्या निष्क्रिय आणि दिशाहीन धोरणांमुळे शिक्षण व रोजगार क्षेत्रात अभूतपूर्व अराजकता निर्माण झाली असून, त्याचा सर्वाधिक फटका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना तायडे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, NEET, NTA, CBSE, PSC, VYAPAM यांसारख्या संस्थांच्या वारंवार होणाऱ्या अपयशामुळे देशातील विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास उडत चालल्याचे नमूद केले. परीक्षा प्रक्रियेत सातत्याने उघड होत असलेले गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना, परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागण्याची वेळ, मानसिक तणाव आणि वाढत्या आत्महत्यांच्या घटनांबाबत सरकारची भूमिका अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानातील कोटा येथे झालेल्या "विद्यार्थ्यांची गूंज" या कार्यक्रमातून देशातील शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार, एनटीएच्या कारभारावरील प्रश्नचिन्हे आणि युवकांच्या रोजगाराच्या हक्कांबाबत सविस्तर भूमिका मांडली होती. त्याच अनुषंगाने काँग्रेस पक्ष राज्यभर जिल्हास्तरीय जनप्रबोधन, विद्यार्थी संवाद आणि जनजागृती अभियान राबवत असून, शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
महानगर काँग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई यांनीही युवकांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. शिक्षण आणि रोजगार हा केवळ राजकीय मुद्दा नसून सामाजिक न्यायाशी संबंधित विषय असल्याचे सांगत, देशातील तरुणांना केवळ आश्वासनांची नव्हे तर गुणवत्तापूर्ण शिक्षण, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि रोजगाराच्या ठोस संधींची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेदरम्यान "विद्यार्थ्यांची गूंज" या सादरीकरणातील महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थात्मक अपयश, प्रश्नपत्रिका फुटीचे वाढते प्रमाण, भरती प्रक्रियेतील अनावश्यक विलंब, रिक्त पदांबाबतची सरकारी उदासीनता, वाढती बेरोजगारी आणि युवकांच्या भविष्यावर निर्माण झालेले संकट याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या राज्यव्यापी अभियानात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार, शाळा-महाविद्यालयीन युवक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, माध्यम प्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले.
देशाच्या भवितव्यासाठी शिक्षण आणि रोजगार हे दोन मूलभूत विषय केंद्रस्थानी आणण्याची गरज असून, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि युवकांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा