akl-crime-news-murder-case: तार फाईल भागात जुन्या वादातून तरुणाची हत्या; आरोपी फरार, सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारफैल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जुन्या वैमनस्यातून एका 29 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत तरुणाची ओळख अंकित धम्मपाल नंदागवळी (वय 29, रा. अफोट फैल, अशोक नगर) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकित याचा काही व्यक्तींशी जुना वाद सुरू होता. याच वादातून दोन आरोपींनी त्याला शनिवारी रात्री साडे दहा अकरा वाजताच्या सुमारास गाठून धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला अंकित रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी कोसळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिरीष खंडारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा केले. पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात हत्येमागे जुना वाद असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या अटकेसाठी रामदासपेठ पोलीस ठाण्याची डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) पथके सक्रिय झाली आहेत.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापेमारी केली जात आहे. आरोपींना लवकरच अटक करून प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या रामदासपेठ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ठळक मुद्दे
*तार फाईल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घटना
*29 वर्षीय अंकित धम्मपाल नंदागवली यांची हत्या
*जुन्या वादातून धारदार चाकूने हल्ला
*आरोपी घटनास्थळावरून फरार
*पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
*डीबी व एलसीबी पथकांकडून आरोपींचा शोध
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा