ठळक मुद्दादोन दिवस दुर्गम जंगलात पायी शोध, ड्रोन-श्वान पथकांच्या मदतीने अखेर आरोपीला बेड्या
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : दहा वर्षांच्या चिमुकलीवर अमानवी अत्याचार करून जंगलात फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी, अकोला पोलिसांनी तब्बल १०५ पोलिसांची ५ वेगवेगळी पथके तयार करत सावरगाव परिसरातील घनदाट जंगलात दोन दिवस अहोरात्र शोधमोहीम राबवली. अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांना यश येत आरोपी जगराम गोविंदा आडे (वय ६०, रा. सावरगाव ता. पातूर जि. अकोला) याला जंगल परिसरातून अटक करण्यात आली.
०५ मे २०२६ रोजी चान्नी पोलीस स्टेशन येथे पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. फिर्यादी व तिचे पती मजुरीसाठी बाहेर गेले असताना घरात एकटी असलेल्या १० वर्षीय मुलीवर आरोपीने अतिशय घृणास्पद अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने चिमुकलीला दिली होती. पीडित मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर तिने तत्काळ पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी चान्नी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध बीएनएस कलम ६४(१), ६५(२), ३५१(२)(३) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ३, ४, ४(२), ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना आरोपीचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीची तीन पथके, चान्नी पोलीस स्टेशनचे पथक, बाळापूर उपविभागातील पोलीस पथके, आरसीपीची दोन पथके, दोन श्वान पथके तसेच चार ड्रोन कॅमेरे अशा मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम उभारण्यात आली.
विशेष म्हणजे आरोपीकडे मोबाईल किंवा वाहन नव्हते. त्याचा कोणताही फोटो पोलिसांकडे उपलब्ध नव्हता. जंगल परिसराची संपूर्ण माहिती असलेल्या आरोपीचा माग काढणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. सावरगाव परिसरातील २० ते २५ किलोमीटर घनदाट जंगलात वाहन जाण्यासाठी रस्ते नसल्याने पोलिसांना रखरखत्या उन्हात पायी फिरून शोधमोहीम राबवावी लागली.
सावरगाव, चोंडी, वनदेव, वसाली, नवेगाव, पांगरताटी, झरंडी, शेकापूर तसेच सावरगाव धरण परिसरात पोलिसांनी सलग दोन दिवस सर्च ऑपरेशन चालवले. यासाठी वन विभागानेही मदतीचा हात पुढे करत डीएफओ सुमन सोळंके यांच्या निर्देशानुसार स्वतंत्र पथक पोलिसांच्या मदतीसाठी पाठवले.
अखेर ७ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वन विभागाचे आरएफओ जाधव यांचे पथक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी जंगल परिसरात आढळून आला. त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी , सहायक पोलीस अधिक्षक निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, रविंद्र लांडे, चान्नी, पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे व पोलीस अमंलदार शेख हसन, महेंद्र मलीये, सुलतान पठाण, खुशाल नेमाडे, किशोर सोनोने, वसीमोददीन, एजाज अहमद, श्रीकांत पातोंड, धिरज वानखडे, राज चंदेल, सतिष पवार, अशोक सोनवणे, आकाश मानकर, स्वप्नील चौधरी, उदय शुक्ला, शेख अन्सार चालक प्रशांत कमलाकर, मनीष ठाकरे, देवानंद खरात, रामकिसन डोईफोडे यांनी पार पाडली.
ठळक मुद्दे
१० वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अटक
१०५ पोलिसांची ५ पथके जंगलात दोन दिवस तैनात
ड्रोन कॅमेरे, श्वान पथक आणि वन विभागाची मदत
आरोपीकडे मोबाईल, वाहन किंवा फोटो उपलब्ध नव्हता
घनदाट जंगलात पायी शोधमोहीम राबवून कारवाई
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीला जंगलातून पकडले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा