reservation-of-water-vaan-dam: अकोलेकरांच्या पाणीप्रश्नासह ब्ल्यू लाईनमधील नागरिकांच्या समस्येवर शिवसेना आक्रमक!

वान धरणाचे पाणी आरक्षित करण्यासाठी आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; ब्ल्यू लाईनमधील घरांचे बांधकाम नकाशे पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली पाणीटंचाई आणि ब्ल्यू लाईन परिसरातील नागरिकांच्या बांधकाम परवानगीसंदर्भातील समस्या या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले, तसेच जिल्हाधिकारी यांनाही वान धरणातील पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्याबाबत निवेदन देण्यात आले.


यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात केवळ १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. परिणामी, अकोला शहरातील नागरिकांना तब्बल १३ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. येणाऱ्या काळात पाण्याची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने पर्यायी पाण्याचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.


सन २०१९ मध्ये वान धरणातील पाणी अकोला शहरासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव या पाणी आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. सध्याची परिस्थिती लक्षात घेता सदर स्थगिती उठवून वान धरणातील पाणी अकोला शहरासाठी पुन्हा आरक्षित करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून शासन व जलसंपदा विभागाकडे तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.


ब्ल्यू लाईनमधील नागरिकांच्या प्रश्नावरही आयुक्तांशी चर्चा


यासोबतच अकोला शहरातील ब्ल्यू लाईन परिसरातील नागरिकांच्या घरांच्या बांधकाम नकाशांना मंजुरी देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या समस्येवरही महानगरपालिका आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या अगोदर या परिसर मध्ये बांधकाम नक्शा मंजूर होत होता आता का बंद केला हा प्रश्न विचारण्यात आला ब्ल्यू लाईन परिसरातील घरांचे बांधकाम नकाशे मंजूर करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आल्यामुळे अनेक नागरिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे संबंधित नकाशे मंजूर करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, नागरिकांना दिलासा द्यावा आणि या प्रश्नावर शासनाच्या नियमांच्या अधीन राहून सकारात्मक मार्ग काढावा, अशी मागणी करण्यात आली.


शहरातील पाणीप्रश्न असो किंवा ब्ल्यू लाईनमधील नागरिकांच्या घरांच्या बांधकाम परवानगीचा प्रश्न असो, या दोन्ही विषयांवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मांडली.


यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश मिश्रा, जिल्हाप्रमुख अश्विन नवले, जिल्हाप्रमुख मंगेश काळे,  युवा नगरसेवक मनोज पाटील, डॉ. अशोक ओलंबे, तरुण बगेरे रमेश गायकवाड, गजानन चव्हाण, गजानन बोराडे, प्रकाश वानखडे, फिरोज पठाण, महिला आघाडीचे देवश्री ठाकरे, सुनिता श्रीवास, विजया राजपूत, योगेश ढोरे, अंकुश शिंत्रे, महेश बगैरे, तुषार इंगळे, पवन पवार, आशुतोष शेगोकार, किरण शिरसाट, बाळूभाऊ पाटील, संजय अग्रवाल, पंकज बाजोड, मधुकर सोनारगण, पडुळकर, राखी पाटेकर, उज्वला इंगळे, संगीता सोनवणे, जयश्री तोंडरमर, अनिल वर्मा, बबलू ओक, मोहम्मद इझहार, अनंत चोपडे, रवी मळावी, राजेश इंगळे, गणेश मालटे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या