garbage-tax-congress-akola: शहर विकासाला पाठिंबा; पण ‘कचरा कर’वर संताप – आ. साजिद खान पठाण यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा



ठळक मुद्दा 

दरवर्षी ६०० रुपयांचा कचरा कर नागरिकांवर अन्यायकारक; सेवा विस्कळीत, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : महानगरपालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरातील नागरिकांवर कचरा संकलनाच्या नावाखाली दरवर्षी ६०० रुपयांचा कर लावण्याचा निर्णय घेतल्याने अकोलेकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आधीच विविध करांच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकांना हा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्याने मनपाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.


दरम्यान, कचरा कराची वसुली सुरू असतानाच शहरातील घंटागाडी सेवा अनेक भागात विस्कळीत झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही ठिकाणी गाड्या वेळेवर येत नाहीत, तर काही भागात सेवा पूर्णपणे बंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचत असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


या पार्श्वभूमीवर आमदार साजिद खान पठाण (काँग्रेस) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत स्पष्ट इशारा दिला आहे. “शहर विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली जनतेच्या खिशावर डल्ला मारणे आम्ही सहन करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


तसेच, “आधीच ‘डर्टी टॅक्स’मुळे नागरिक त्रस्त असताना त्यात आणखी ६०० रुपयांचा कचरा कर लादणे म्हणजे सामान्य माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा निर्णय आहे,” असा आरोप त्यांनी केला.


मनपाने नागरिकांवर करांचा भार टाकण्याऐवजी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. शहरातील मोक्याच्या जागांचा योग्य वापर करून महसूल वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेषतः दानाबाजार परिसरात अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून स्थानिक व्यापाऱ्यांना सवलती देत विकास साधावा, अशी मागणी त्यांनी केली.


“शहराच्या विकासासाठी चांगल्या उपक्रमांना आम्ही नेहमीच पाठिंबा देऊ; मात्र जनतेची पिळवणूक करणारे निर्णय खपवून घेतले जाणार नाहीत,” असा इशारा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले.


यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसैन, कपिल रावदेव, प्रिया शिरसाट, आर्शिया परवीन, निखत परवीन, निलोफर खान, आकाश कवडे, गुड्डू पठाण, मोहम्मद शारिक यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


ठळक मुद्दे

  • दरवर्षी ६०० रुपयांचा कचरा कर लावण्याचा निर्णय

  • नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप

  • घंटागाडी सेवा अनेक भागात विस्कळीत

  • शहरात कचऱ्याचे ढिग; स्वच्छतेचा प्रश्न गंभीर

  • आ. साजिद खान पठाण यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

  • पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधण्याची मागणी

  • दानाबाजारमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव



टिप्पण्या